esakal | केडीसीसीच्या मंडपात इच्छुकांचे बाशिंग
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

केडीसीसीच्या मंडपात इच्छुकांचे बाशिंग

sakal_logo
By
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : कोरोनामुळे बोनस कालावधी मिळालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) संचालक मंडळ निवडणूकपूर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. गोकुळ निवडणुकीनंतर ‘केडीसीसी’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुक बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षांत बँक प्रत्येक क्षेत्रात प्रगतिपथावर आहे. त्यामुळे गोकुळप्रमाणेच जिल्हा बँक संचालक पदालाही विशेष महत्त्व आले असून त्यासाठी इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात १०६ सेवा संस्थांसह दूध, पतसंस्था, पाणी संस्था व औद्योगिक संस्थाही सभासद आहेत.

तालुक्यात संस्था गटातून संतोष पाटील, तर राखीव गटातून अप्पी पाटील संचालक आहेत. संतोष पाटील यांनी पुढाकार घेऊन ठरावही सादर केले आहेत. संस्था गटातून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अप्पी पाटीलही फिल्डींग लावत आहेत. गोकुळमध्ये एक पाऊल मागे घेतलेले शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर आता केडीसीसीसाठी प्रयत्नशील आहेत.

यापूर्वीच त्यांनी ठरावही जमा करून सादर केले आहेत. गतवेळी नशीब आजमावलेले सोमगोंडा आरबोळे यांचा पुन्हा रिंगणात येण्याचा मनसुबा आहे. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांची गोकुळमधील उमेदवारी एका रात्रीत कापली गेली. तरीही त्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहून काम केले.

त्यामुळे आता पाटील यांना केडीसीसीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते आग्रही आहेत. पंचायत समितीचे माजी सभापती दीपकराव जाधव हे संस्था गटातून इच्छुक आहेत. गोडसाखरचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे हे पहिल्यांदाच केडीसीसीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

निवडणूक बिनविरोध होणार की, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार याबाबत संकेत नाहीत. सध्या तरी उमेदवारीची पोतडीही बंदिस्तच राहणार आहे. गोकुळ निवडणुकीत तालुक्याची पाटी कोरी राहिली असून केडीसीसीत ही उणीव भरून काढावी आणि तालुक्यासाठी दोन जागा अबाधित ठेवून पॅनेलची रचना करण्याची जनतेची अपेक्षा आहे.

‘केडीसीसी’चे रणांगण ; दृष्टिक्षेपात गडहिंग्लज तालुका

  1. विद्यमान संचालक : संतोष तात्यासाहेब पाटील, अप्पी पाटील

  2. तालुक्यातील पात्र संस्था : ४७१

  3. विकास सोसायटी गट : १०६

  4. प्रक्रिया संस्था गट : ७

  5. नागरी बँक, पतसंस्था गट : ८५

  6. पाणीपुरवठासह इतर संस्था : २७३

loading image
go to top