esakal | शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनची चिंता! 

बोलून बातमी शोधा

Farmers Worry About Server Down Kolhapur Marathi News

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी, अशी जाहिरात करीत राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. मात्र, थकबाकीदारांचे आधार प्रमाणिकरण करताना सर्व्हर डाऊनची चिंता भेडसावत आहे. त्याचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनची चिंता! 
sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी, अशी जाहिरात करीत राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. मात्र, थकबाकीदारांचे आधार प्रमाणिकरण करताना सर्व्हर डाऊनची चिंता भेडसावत आहे. त्याचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

तीन दिवसात निम्म्याच लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. 
आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेतून 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठित कर्ज माफ केले जाणार आहे. प्रत्येक थकबाकीदार शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी जमीनधारणेच्या क्षेत्राचा विचार करण्यात आलेला नाही. 

यापूर्वीच्या युती सरकारने दिलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांतून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यापासून बोध घेत महाविकास आघाडी सरकारने नव्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पहिल्या यादीत तालुक्‍यातील एकाही थकबाकीदार शेतकऱ्याचा समावेश नव्हता. दोन दिवसापूर्वी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्‍यातील तीन हजार 608 थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

शासनाकडून जाहीर झालेल्या यादीतील पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच कर्जमाफीची रक्कम खात्यावर वर्ग होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी संबंधित गावातील ग्रामपंचायत, बॅंक, शाहू सुविधा केंद्रात सोय उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, आधार प्रमाणिकरण करताना सर्व्हर डाऊनचा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. तासन्‌ तास तिष्ठत बसावे लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने आधार प्रमाणिकरण न करताच माघारी परतण्याचीही वेळ येत आहे. एकाचवेळी सर्वत्र काम सुरू असल्याने ही परिस्थिती उद्‌भवल्याचे सांगितले जाते. 

मुदतीबाबत तोंडी सूचना... 
आधार प्रमाणिकरण करण्यासाठी मुदत देण्यात आलेली नाही. लेखी आदेश नसले तरी तोंडी सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार आजपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण होणे अपेक्षित होते. पण, सर्व्हर डाऊनमुळे निम्म्याच लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

बाहेरगावच्या, मयत लाभार्थ्यांचा प्रश्‍न... 
कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेले काही लाभार्थी बाहेरगावी राहणारे आहेत. आधार प्रमाणिकरणात त्यांची अडचण झाली आहे. मात्र, सदरचे लाभार्थी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणच्या शाहू सुविधा केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण करता येईल. तसेच लाभार्थी मयत असेल तर त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेले आहेत.