
सांगली : कडेपूर येथे महामार्गावर कोल्ह्याचा मृत्यू
कडेगाव (सांगली) : कडेपूर (ता.कडेगाव) येथे कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना घडली आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता.1) रात्री बाराच्या सुमारास कोल्हा मृतावस्थेत नागरिकांना आढळून आला.तर प्रथम दर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.परंतु याबाबत कडेगाव-पलूस वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याने नागरीकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये कडेपूर येथे विद्युत वाहक ताराना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने दोन कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता.
यावेळी वनविभागाने तात्काळ दखल घेतली होती.तर प्रथमदर्शनी अपघाती मृत्यू दिसत होता तरीही वन गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला होता. तर शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास कडेपूरहून कडेगावला येत असलेल्या युवा सेना तालुका प्रमुख राहुल चन्ने यांना येथे दौलत यादव यांच्या घरानजीक महामार्गावर कोल्हा मृतावस्थेत आढळून आला.तसेच काल शनिवारी (ता.2) सकाळी येथील इतर नागरिकांनाही येथे महामार्गावर मृतावस्थेत कोल्हा पाहिल्याचे कडेपूरचे माजी सरपंच प्रतापराव यादव यांनी सांगितले. याबाबत कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता याबाबत वन विभाग अनभिज्ञ होता.