
Friendship Day 2022: कोल्हापूरच्या सात जिगरी मित्रांनी सुरू केली समाजसेवी संस्था
कोल्हापूर - सायबरच्या समाजकार्य विभागाची १९८४ ची बॅच, सहा विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यांची जिगरी मैत्री. महाविद्यालयीन जीवनानंतर ती कायम राहिली आणि सामाजिक कामातून ती समृद्ध होत राहिली. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून वैविध्यपूर्ण उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
आत्मसाह्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य आजही सुरू आहे. आशा पटवेगार प्रॉव्हिडंट फंड विभागातील सेवानिवृत्त अधिकारी. छाया डिसले मूळच्या कोल्हापूरच्या. त्या लग्नानंतर चिपळूणवासीय झाल्या. सुलभा गायकवाड जिल्हा परिषदेच्या अपंग कल्याण विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी, मनीषा जाधव मदनमोहन लोहिया मूकबधिर विद्यालयातून सामाजिक कार्यकर्त्या, तर अशोक पोतनीस लोण कौन्सिलर. दीप्ती कदम चिपळूण हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाल्या असून, माधुरी आष्टीकरही सेवानिवृत्त कार्यकर्त्या. समाजकार्य विभागातून शिकत असताना त्यांच्या मैत्रीची नाळ घट्ट झाली.
सामाजिक बांधिलकीतून काहीतरी उपक्रम करायला हवेत, याची खूणगाठ मनाशी बांधून ते कार्यरत राहिले. प्रत्येक जण लग्नानंतर कोल्हापूर सोडून वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले असले तरी सामाजिक उपक्रमांसाठी ते एकत्र आजही येतात. काही जण पुन्हा कोल्हापूरचेच रहिवासी झाले.
आत्मसाह्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावली केअर सेंटर व मातोश्री वृद्धाश्रम येथे वृक्षारोपण, बालकल्याण संकुल येथे कौशल्य विकासाचे कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. महापूर पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही त्यांचा पुढाकार होता. महावीर गार्डन येथे महावीर उद्यान हास्य मंचतर्फे ते नागरिकांच्या आयुष्यात हास्य फुलविण्याचे काम करत आहेत. उपक्रमांसाठी लागणारा खर्च मात्र ते स्वतःच करतात. एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगाला धावून जात असताना समाजातील घटकांना आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मैत्रीचं नातं चिरंतन असलं पाहिजे. त्यात समाजाचं हित साधता आलं तर त्या नात्याला वेगळा अर्थ आहे. आम्ही महाविद्यालयीन आयुष्यात शिकत असताना त्यानंतरही मैत्री जपत सामाजिक काम करत राहिलो. आजही एखादा उपक्रम घ्यायचा म्हटले तर प्रत्येक जण जीव ओतून काम करतो, हे आमच्या मैत्रीचं यश आहे.
- मनीषा जाधव.
Web Title: Friendship Day 2022 Social Service Organization Started Seven Jigri Friends Of Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..