Friendship Day 2023 : मैत्रीच्या स्मृती जपणारा कोल्हापूरचा राजमार्ग - भावसिंगजी रोड

सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे अत्यंत दिलदार स्वभावाचं व्यक्तिमत्व
friendship day 2023 Bhavsinghji Road of Kolhapur preserves memory of friendship
friendship day 2023 Bhavsinghji Road of Kolhapur preserves memory of friendship Sakal

Friendship Day 2023 : सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे अत्यंत दिलदार स्वभावाचं व्यक्तिमत्व. त्यांच्या औदार्याच्या कित्येक कथा मोठ्या अभिमानाने सांगाव्यात अशाच आहेत. आज अशीच एक गोष्ट त्यांच्या राजबिंड्या मैत्रीची.

शाहू महाराजांच्या शैक्षणिक आयुष्यातील काही वर्षे त्यांनी राजकोट येथील राजकुमार कॉलेज येथे घालवली. त्याच ठिकाणी शाहू महाराजांना एक उमदा मित्र लाभला, भावनगरचे राजकुमार भावसिंगजी महाराज.

शालेय शिक्षण घेताघेता या दोघांची मैत्री चांगलीच जमली. राजकोट नंतर धारवाड मुक्कामी पुन्हा या दोन मित्रांचे शिक्षण चालू राहिले. अभ्याससहल म्हणून शिक्षक सर फ्रेजर यांनी महाराजांच्या भारतभ्रमणाचे आयोजन केले त्यावेळीही शाहू महाराजांसोबत भावसिंगजी महाराज होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही या दोघांची मैत्री कायम राहिली. कधी शाहू महाराज भावनगरला तर भावसिंगजी महाराज कोल्हापूरला मुक्कामासाठी येत असत.

एकदा शाहू महाराज शिकारी साठी गेले असताना वाघाची शिकार त्यांच्या जीवावर बेतत होती. ही गोष्ट जेंव्हा भावसिंगजी महाराजांना कळली तेंव्हा त्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहून त्यांना इथून पुढे शिकारीला जाताना काळजी घ्या अशी विनंती केली होती.

शाहू महाराजांनी सुद्धा भावसिंगजी महाराज यांना पत्र लिहून आपल्या नोकरवर्गाची काळजी कशी घ्यावी याविषयीचे मार्गदर्शन केले होते. या दोन मित्रांच्यात असा पत्रव्यवहार नियमीत होत असे.

दिल्ली येथे एका कार्यक्रमप्रसंगी या दोघांचा मुक्काम असताना, दिल्लीच्या थंडीतही शाहू महाराज भल्या पहाटे उठून थंड पाण्याने कशी आंघोळ करतात आणि ही शिस्त आपल्या मुलांनीही अंमलात आणावी यासाठी भावसिंगजी महाराज आपल्या मुलांना पहाटे पाच वाजता उठवून शाहू महाराजांच्या भेटीला गेले होते.

जुलै 1919 मध्ये भावसिंगजी महाराजांचे निधन झाले. त्यापूर्वी शाहू महाराजांचे द्वितीय पुत्र प्रिन्स शिवाजी यांचाही अपघाती मृत्यू झाला होता. लागोपाठ बसलेल्या या दोन जिवलग माणसांच्या निधनाचे दुःख महाराजांच्या जिव्हारी लागले. त्यांनी जाहीर कार्यक्रमातही हे दुःख बोलून दाखवले होते.

भावसिंगजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी भावनगरला जाऊन भावसिंगजींच्या मुलांना मानसिक आधार दिला आणि त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. अशा या दोन जिवलग मित्रांनी आपापल्या राज्यात या मैत्रीच्या आठवणी चिरकाल रहाव्यात याची व्यवस्था केली होती.

भावसिंगजी महाराज यांनी आपल्या राज्यातील माहुवा शहरात एक नवा राजवाडा बांधला. त्याचे उद्घाटन शाहू महाराजांच्या हस्ते करून भावसिंगजी महाराजांनी त्या राजवाड्याचे नामकरण 'शाहू पॅलेस' असे केले होते.

कोल्हापूरातही जुना राजवाडा आणि बावडा येथील नवा राजवाडा यांना जोडणारा जो राजमार्ग आहे त्या मार्गाला 'भावसिंगजी रोड' हे नाव शाहू महाराजांनी समारंभपूर्वक दिले आणि आपल्या जिवलग मित्राच्या स्मृती चिरंतन केल्या.

या रस्त्यावरून जाताना नव्या पिढीच्या कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांच्या मैत्रीचा हा इतिहास आठवायलाच हवा, म्हणून हा छोटा लेखन प्रपंच..!!

-इंद्रजीत माने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com