esakal | शाहू सहकारी कारखाना 'एकरकमी एफआरपी' देणार - समरजितसिंग घाटगे
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू सहकारी कारखाना 'एकरकमी एफआरपी' देणार - समरजितसिंग घाटगे

एफआरपीची कोंडी फोडणारा शाहू हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.

शाहू सहकारी कारखाना 'एकरकमी एफआरपी' देणार - समरजितसिंग घाटगे

sakal_logo
By
नरेंद्र बोते

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याकडून एफआरपीची रक्कम २९९३ रुपये एकरकमी देण्यात येणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली. एफआरपीची कोंडी फोडणारा शाहू हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. कारखान्याच्या सभागृहात ही पत्रकार परिषद संपन्न झाली.

यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, या वर्षी आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेले पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप जमा केलेले नाही. कर्जमाफीपासूनही काही शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे एकूणच शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत शाहू साखर कारखान्याने एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अलिकडे एफआरपी दोन तुकडे करणार अशी चर्चा असली तरी राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ते पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पिराजीराव घाटगे, स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी हरितक्रांती साकारली आहे. शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देणारे निर्णय घेतले. स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी तर शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त मोबदला देता यावा, यासाठी शाहू साखर कारखान्याची स्थापना केली. उच्चांकी ऊस दर देण्यात शाहू कारखाना सातत्याने अग्रक्रमावर राहिला आहे. हाच वारसा आम्ही पुढे चालवीत आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरी केंद्रीत विचारांचा वारसा आम्ही जपत आहोत.

यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक डी.एस. पाटील, यशवंत उर्फ बॉबी माने, मारुती निगवे, सचिन मगदूम, भुपाल पाटील, बाबुराव पाटील, एम.डी. पाटील, पी. डी. चौगुले, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, फायनान्स मॅनेजर आर.एस. पाटील उपस्थित होते. शाहू साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकरी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

loading image
go to top