esakal | गडहिंग्लजला किट अभावी "सुपर स्प्रेडर'ची टेस्ट रखडली
sakal

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Missed The Test Of Corona "Super Spreader" Due To Lack Of Kit Kolhapur Marathi News

गडहिंग्लज शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ज्यांच्यापासून अधिक गतीने कोरोनाचा संसर्ग होतो, त्या "सुपर स्प्रेडर' व्यक्तींच्या कोरोना टेस्टची अवस्था अद्याप "बोलाचीच कढी...बोलाचाच भात' अशी आहे

गडहिंग्लजला किट अभावी "सुपर स्प्रेडर'ची टेस्ट रखडली

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ज्यांच्यापासून अधिक गतीने कोरोनाचा संसर्ग होतो, त्या "सुपर स्प्रेडर' व्यक्तींच्या कोरोना टेस्टची अवस्था अद्याप "बोलाचीच कढी...बोलाचाच भात' अशी आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुपर स्प्रेडर व्यक्तींची टेस्ट होण्याची गरज ठळक झालेली असताना अजूनही त्याला मुहूर्त मिळेनासा झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आवश्‍यक त्या प्रमाणात अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध होत नसल्याने ही टेस्ट लांबत चालली आहे. 

कोरोना लॉकडाउननंतर बाजारपेठा अनलॉक झाल्या आहेत. सारे व्यवहार सुरळीत झाले; परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी किती लोक खबरदारी घेत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला कंटेन्मेंट झोनही शिथिल करण्यात आले आहेत. शहरात कंटेन्मेंट झोनवरून व्यापाऱ्यांची आक्रमकता प्रशासनाने पाहिली; परंतु संसर्ग टाळण्यासाठी स्वत:पासून उपाययोजना सुरू करताना ही आक्रमकता दिसून येत नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या आस्थापनांमध्ये नियमांचे काटेकोर पालन होताना दिसते. 

अनेक फेरीवाले, भाजी विक्रेत्यांकडे ग्लोवज्‌ नसतात. सोशल डिस्टन्सचा तर विचारच न केलेला बरा अशी स्थिती आहे. कोरोनाला संधी देण्याचाच हा प्रकार असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांतही बाजारपेठा आहेत. तेथेही यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. ज्यांच्यापासून कोरोनाचा अधिक संसर्ग होतो त्या अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींची अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन तालुका आणि शहरातील प्रशासनाने केले.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समाविष्ट गावागावांतील सुपर स्प्रेडर व्यक्तींची यादीही तयार करण्यात आली. पालिका प्रशासनाकडेही फेरीवाल्यांच्या नोंदी असून यादी तयार आहे; मात्र सुपर स्प्रेडरची संख्या आणि उपलब्ध अँटिजेन कोरोना टेस्ट किटमध्ये मोठी तफावत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रथम संपर्कातील व्यक्ती, गरोदर माता आणि अत्यावश्‍यकसाठीच किट कमी पडत आहेत. त्यात सुपर स्प्रेडर तपासणीसाठी किट कोठून मिळणार, हा प्रश्‍न आहे. सुपर स्प्रेडरची टेस्ट झाल्यास त्यांच्यापासून होणारा संसर्ग थांबवता येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रश्‍नी लक्ष घालून ही कार्यवाही तातडीने करणे गरजेचे असून अँटिजेन किट उपलब्ध करावेत, अशी मागणी होत आहे. 

कोण आहेत सुपर स्प्रेडर ? 
ज्यांच्याशी अधिकाधिक लोक समूहाचा संपर्क येतो, त्यांना सुपर स्प्रेडर म्हणून संबोधले आहे. यामध्ये प्रामुख्याने ढकलगाड्यावरून मालाची विक्री करणारे फेरीवाले, तसेच भाजी विक्रेत्यांचा समावेश होतो. सलून्स, चहा टपऱ्या, पानपट्टी, हॉटेल्स यांसह गर्दी खेचणाऱ्या छोट्या-मोठ्या दुकानांचाही यात समावेश आहे. ज्या ठिकाणावरून नागरिक कोरोना वाहक बनतो ती सर्व गर्दीची ठिकाणे यात समाविष्ट आहेत. अशा सर्वांची अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन अद्याप कागदावरच राहिले आहे. 

दृष्टिक्षेपात शहरातील हॉकर्स व दुकाने 
- नोंदणीकृत हॉकर्स : 216. 
- नोंदणी न केलेले हॉकर्स : साधारण 120. 
- भाजी विक्रेत्यांची संख्या : साधारण 125. 
- विविध छोटी-मोठी दुकाने : 700 पेक्षा अधिक. 

संपादन - सचिन चराटी

loading image
go to top