
Ganesh Chaturthi 2022 : घरगुती गणेश विसर्जन आज
कोल्हापूर : घरगुती गणेशमूर्तींचे आपापल्या प्रभागात उद्या (ता. ५) पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन होण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. पंचगंगा नदी, तलावात विसर्जन होऊ नये यासाठी शहरात महापालिकेसह विविध संस्थांच्या सहकार्याने १८० कृत्रिम विसर्जन कुंड ठेवली आहेत. तसेच कर्मचारी, हमाल तसेच ‘एकटी’ संस्थेच्या महिला अशा ११७५ जणांची नेमणूक केली आहे. विविध भागांतील या कुंडामध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती इराणी खाणीपर्यंत आणण्यासाठी ९० टेम्पो, १०डंपर, २४ ट्रॅक्टर-ट्रॉली तैनात केलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कुंडामध्येच मूर्तींचे, तसेच निर्माल्याचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी २५ ठिकाणी कुंड ठेवली होती. तिथे चारशेहून अधिक मूर्ती विसर्जित करून शहरवासीयांनी यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीनेच गणेश विसर्जन करणार असल्याचे दाखवून दिले. उद्या होत असलेल्या घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात एक ते चार अशा पद्धतीने १६० तर काही संघटना, सोसायटी, मंडळांनीही कृत्रिम विसर्जन कुंड ठेवली आहेत. या सर्व ठिकाणी विसर्जित केल्या जाणाऱ्या मूर्ती व निर्माल्य वाहतूक करण्यासाठी महापालिकेने यंत्रणा तयार ठेवली आहे. कुंडाजवळ लाईटची व्यवस्था केली असून, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सफाई केलेली आहे. मूर्ती व निर्माल्य अर्पण करण्याचे फलकही ठिकठिकाणी लावले आहेत.
कुंडांजवळ पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, ९० टेम्पो, २०० हमाल तैनात केले आहेत. कुंडांच्या ठिकाणी आलेल्या मूर्ती या टेम्पोत, तसेच १० डंपर, २४ ट्रॅक्टर-ट्रॉलीतून इराणी खाणीकडे आणण्यात येणार आहेत. याशिवाय ५ जेसीबी, पाण्याचे सात टँकर, दोन रोलर, दोन बुम अशी वाहनेही मदतीसाठी ठेवली आहेत. पंचगंगा नदी घाट, रंकाळा तांबट कमान, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, मंगेशकरनगर खाण, रुईकर कॉलनी विहीर, बापट कॅम्प, राजाराम बंधारा, कळंबा तलाव, रंकाळा टॉवर, संध्यामठ, कोटीतीर्थ शाळा तसेच मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कृत्रिम विसर्जन कुंडातच मूर्ती, निर्माल्य विसर्जित करून शहरवासीय, जिल्ह्यातील जनता यावर्षीही पर्यावरण रक्षणाची वाटचाल कायम ठेवतील. घरगुती गणेश विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे खुले होणार असून, आगामी चार दिवसांत गणेशोत्सवाच्या जल्लोषी वातावरणात रंग भरला जाणार आहे.
४० जवान तैनात
अग्निशमन यंत्रणेचे साधनसामग्रीसह ४० जवान, तसेच स्वयंसेवी संस्थांचे ३० स्वयंसेवक विविध विसर्जनस्थळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. विविध ठिकाणी ते रात्री उशिरापर्यंत थांबणार आहेत.
महापालिकेशी संपर्क साधावा
महापालिकेच्या कुंडांशिवाय सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्थाही कुंड ठेवणार आहेत. संबंधित विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील संस्थांनी ठिकाणाची माहिती व मूर्तींची संख्या कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील (७७०९०४२१७१), शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता नारायण भोसले (९३४२७१७१११), राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता बाबूराव दबडे (७०२०४१०७४४), ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे (९४२११७२०९४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनाचा देशभर लौकिक करूया : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात लोकांनी सुरू केलेली पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व निर्माल्य दानाची परंपरा आणि चळवळ कायम राहील. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडली तर योग्य त्या मार्गाने गणेश विसर्जन करायला हरकत नाही. पण, प्रशासन कुठेही कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. भक्तिभावाने पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. याला लोकांकडूनही मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात याची तयारी केली आहे. कोल्हापूर शहरातही प्रभागनिहाय विसर्जन कुंड निर्मित केले जात आहेत. इचलकरंजी शहरात जय्यत तयारी केली आहे. पर्यावरणमंत्री दीपक केसरकर यांनाही या सर्व नियोजनाची माहिती दिली आहे. त्यांनीही या नियोजनानुसारच विसर्जन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरवासीयांनी स्वतः सुरू केलेली ही चळवळ यावर्षीही कायम ठेवून महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात कोल्हापूरचा नावलौकिक करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले.
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
कोल्हापूर शहरासह इचलकरंजी व ग्रामीण भागात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनासाठी बनण्यात आलेले कृत्रिम कुंड, जलस्त्रोत आणि गर्दीची ठिकाणी येथे पोलिसांचा खडा पहारा आहे. येथील वाहतूक मार्गातही ताप्तुरता बदल करण्यात आला असून, अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठेवले आहेत. विसर्जनादरम्याम कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारी, कर्मचारी सज्ज आहेत.
रंकाळा तलावासभोवती ६ कुंड
रंकाळा तलावात एकही मूर्ती विसर्जित केली जात नाही. त्या परिसरातील नागरिकांसाठी विविध ठिकाणी कुंड ठेवलेली आहेत. तसेच रंकाळा तलावासभोवतीही सहा ठिकाणी कुंड ठेवलेली आहेत. त्यामध्ये रंकाळा चौपाटी, तांबट कमान, संध्यामठ, राजे संभाजी मंडळ, पदपथ उद्यान, पतौडी खाण या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मूर्ती विसर्जन करणार असतील, त्यांना इराणी खाणीकडे जावे लागणार आहे.
निर्माल्याचे होणार सेंद्रिय खत
निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाने १६ आरोग्य निरीक्षकांची टीम व ‘एकटी’ संस्थेच्या १०० महिला नेमल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारीही नेमले आहेत. संकलित केलेले निर्माल्य पुईखडी येथे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे.
पोलिस बंदोबस्त असा
पोलिस अधीक्षक १
अपर पोलिस अधीक्षक २
पोलिस उपाधीक्षक ६
पोलिस निरीक्षक ३०
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ९०
पोलिस कर्मचारी २ हजार
होमगार्ड १५००