
ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती.
Kolhapur : 'मला माफ करा, गुडबाय लाईफ' असं स्टेट्स टाकून 21 वर्षीय तरूणीचा खून
कोडोली (कोल्हापूर) : गिरोली घाट (ता. पन्हाळा) येथील पांडवलेणी परिसरात काल रात्री चारचाकी वाहनातच तरुणीचा नॉयलान दोरीनं गळा आवळून व डोक्यात वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिथंच तरुणानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) दाखल करण्यात आलं.
घटनास्थळी कोडोली पोलिसांचा (Kodoli Police) फौजफाटा दाखल झाला होता. खुनाचं नेमकं कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालं नव्हतं. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. कैलास आनंदा पाटील (२६, रा. लिंगनूर, ता. कागल) असं तरुणाचं नाव आहे. या घटनेनं खोतवाडी परिसर हादरला आहे.
'मला माफ करा, मी जात आहे'
याबाबत कोडोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी : खुनानंतर कैलासनं व्हॉटस्ॲप् स्टेट्सवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकला. त्याचा मेसेज पाहून कुटुंबीयांसह मित्र परिवारात अस्वस्थता निर्माण झाली. कैलासनं वडिलांना रात्री आठच्या सुमारास विषप्राशन केल्याची माहिती दिली. वडिलांनी तातडीनं वडगाव पोलिस ठाण्यात आपल्या मित्राला ही माहिती दिली. कोडोली पोलिस ठाण्यात त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कैलासचे लोकेशन पडताळून पाहण्यात आले. पोलिसांनी गिरोली घाटाकडं धाव घेतली. त्यांना घटनास्थळी कैलास अत्यवस्थ अवस्थेत आढळला. रात्रीची वेळ व निर्जन परिसर असल्यामुळे तपासात अडथळा निर्माण होत होता.
दोघांच्या नातेवाइकांना बसला धक्का
खोतवाडीत रात्री साडेनऊच्या सुमारास खुनाची घटना समजली. गावातील काही प्रमुख लोक व ऋतुजाचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. खोतवाडीतील तिच्या घरासमोर नातेवाईक व नागरिकांनी रात्री मोठी गर्दी केली होती. ऋतुजा पेठवडगाव येथील एका महाविद्यालयात डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती. तेथेच ती वसतिगृहात राहत होती. काल सांयकाळी पाचच्या सुमारास ती कैलासबरोबर मोटारी (एम एच १८ - एचव्ही ८९९१) तून पन्हाळ्याच्या दिशेने गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. कैलास व ऋतुजाचा नातेवाईक आहे. त्यामुळे या प्रकारानंतर दोघांच्या नातेवाइकांना धक्का बसला आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. त्यांनी कोडोली पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड तपास करीत आहेत. दरम्यान, कैलास शेतकरी कुटुंबातील आहे. आई-वडील व तीन विवाहित बहिणी असा त्याचा परिवार आहे.
जनरेटर उजेडात पंचनामा
घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी तेथे रात्री जनरेटरची व्यवस्था केली. त्या प्रकाशात परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. फॉरेन्सिक पथक तसे ठसे तज्ज्ञांचेही पथक रात्री बाराच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले होते.
कैलासने ऋतुजाचा गळा आवळून आणि डोक्यात वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा प्राथमिक संशय असून, या दिशेनं तपास सुरू आहे.
-शीतलकुमार डोईजड, सहायक पोलिस निरीक्षक, कोडोली