‘गोकुळ’ सत्तांतरानंतरचा दणका; तरुणांची नोकरी धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोकुळ’ सत्तांतरानंतरचा दणका;  तरुणांची नोकरी धोक्यात

‘गोकुळ’ सत्तांतरानंतरचा दणका; तरुणांची नोकरी धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ) (Gokul Dudha Sangh)‘लाख’मोलाची रोजंदारी कर्मचारी म्हणून नोकरी मिळवलेल्या सुमारे २०० कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आली आहे. तडजोडीतून मिळवलेली नोकरी गेल्याने आणि भविष्यात पुन्हा संधी मिळेल का नाही या भीतीपोटी या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली असून यात सर्वच संचालकांनी भरलेल्या लोकांचा समावेश आहे.(Gokul-200-youth-job-vacancies-case-kolhapur-update-marathi-news)

‘गोकुळ’मध्ये तब्बल ३० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. नूतन संचालकांनी दिलेल्या पहिल्याच भेटीत संचालक नविद मुश्रीफ यांनी हॉटेलमधील संघाचे खाते बंद करण्याबरोबरच हार, तुरे व पुष्पगुच्छ न आणण्याची सूचना केली होती. याच भेटीत काही संचालकांनी गेल्या तीन-चार महिन्यांत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरती केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी घालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर आलेल्या या कर्मचाऱ्यांना गेटवरूनच परत पाठवले.

हेही वाचा- विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे कोकणवासीयांना आश्वासन

‘गोकुळ’मधील नोकरभरती हा आतापर्यंत कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत ठरावदारांची मुले, त्यांच्या नातेवाइकांच्या मुलांना रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर घेतले होते. अर्थात यासाठी काही तडजोडीही झाल्या. ‘लाख’मोलाच्या संचालकांमार्फत नोकऱ्या मिळवल्या. यातही काहींना कारकून म्हणून काम देतो असे सांगून कॅन धुवायला लावणे, स्वच्छता करणे यासारखी कामे लावली. अशा कर्मचाऱ्यांना ही नोकरीच नको असे म्हणत तडजोड केलेल्या संबंधितांकडे तगादा लावला आहे. आता गेल्या दोन दिवसांत या सर्वच कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत कामावरच न येण्याचे आदेश दिल्याने ‘लाख’मोल देऊन नोकरी मिळवलेल्या या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

आकृतिबंधानुसार संघात जेवढे आवश्‍यक कर्मचारी आहेत त्यांना ठेवून इतरांना कमी करण्यात येणार आहे. अजून रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय व्हायचा आहे, किती कर्मचारी आहेत, ते पाहून निर्णय होईल. काही लोकांच्या बदल्याही कराव्या लागणार आहेत.

- विश्‍वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ दूध संघ

जनसंपर्क अधिकारी बदलले

निवडणूक निकालानंतर संघात सुडाचे राजकारण करणार नाही अशी जाहीर घोषणा नेत्यांनी केली होती; पण त्याची शाई वाळण्यापूर्वीच पहिल्यांदा संघात जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील यांना हटवून त्यांच्या जागी सचिन पाटील यांची नियुक्ती केली. याशिवाय काही शिपाई आणि तृत्तीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत.

loading image
go to top