esakal | सत्ताधाऱ्यांना धक्का : "गोकुळ' च्या मतदानाचा मार्ग मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधाऱ्यांना धक्का : "गोकुळ' च्या मतदानाचा मार्ग मोकळा

सत्ताधाऱ्यांना धक्का : "गोकुळ' च्या मतदानाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
निवास चौगले

कोल्हापूर : केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने "गोकुळ' चे 2 मे रोजी होणाऱ्या मतदानातील अडथळाही दूर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सत्तारूढ गटाला जबर धक्का बसला आहे.

"गोकुळ' च्या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून दोन संस्थांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या सोमवारी (ता. 19) रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही सुनावणी काल (ता. 26) रोजी सुनावणी होती, तथापि सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने ही सुनावणी रद्द करून ती आज ठेवण्यात आली होती.

आज सकाळी न्यायमुर्ती उदय ललित व ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अर्ध्या तासांच्या युक्तीवादानंतर खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती न देताना मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश देत ही याचिका निकालात काढली. आजच निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या निवडणुकीसाठी 12 तालुक्‍यात 35 मतदान केंदे जाहीर केली होते. आता यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणखी 35 केंद्रांची वाढ करावी लागणार आहे.

ही निवडणूक पुढे जावी यासाठी सत्तारूढ गटाचे प्रयत्न सुरू होते तर विरोधकांनी मात्र ही निवडणूक आताच व्हावी यासाठी तयारी ठेवली होती. अखेर न्यायालयीन लढाईत सत्तारूढ गटाला पराभव स्विकारावा लागल्याने विरोधकांची बाजू भक्कम झाल्याचे बोलले जाते. 2 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Edited By- Archana Banage

loading image
go to top