esakal | गोकुळ मतदानास चुरशीने प्रारंभ; मतदान केंद्राबाहेर उमेदवार, कार्यकर्ते हजर

बोलून बातमी शोधा

null

VIDEO : गोकुळ मतदानास चुरशीने प्रारंभ; मतदान केंद्राबाहेर उमेदवार, कार्यकर्ते हजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या मतदानाला जिल्ह्यात सर्व ठिकाणी चुरशीने प्रारंभ झाला. सकाळी सात वाजल्यापासून मतदार आपला हक्क बजावत होते. येथील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये करवीर तालुक्यातील मतदारांनी मतदानाला सुरुवात केली. केंद्राबाहेर कार्यकर्ते, उमेदवार मतदारांच्या स्वागताला उभे होते.

जिल्ह्याच्या राजकारणाची भविष्यातील समीकरणे ठरवणारी गोकुळ निवडणूकची आहे. निवडणुकीसाठी सुरुवातीला ४८२ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ७६ अर्ज अवैध ठरले. तर १९६ जणांनी माघार घेतली. अखेर ४५ जणांची उमेदवारी निश्चित झाली. दोन पॅनलमध्ये या उमेदवारांची विभागणी झाली आहे.

गेले दोन महिने प्रचाराची रणधुमाळी प्रत्येक गावात उडत होती. आज (ता.२) सकाळी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. सुरुवातीला मतदानाची गती कमी होती. मात्र नंतर मतदारांची गर्दी वाढली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर पहिल्यांदा थर्मलगनच्या सहाय्याने मतदाराचे तापमान बघितले जाते. ऑक्सीमीटरच्या साह्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे तपासले जाते. त्यानंतर सॅनिटायझर हातांना लावून मतदाराला मतदान कक्षात प्रवेश दिला जातो. मास्क मतदान केंद्रावर बंधनकारक आहे.

सकाळच्या पहिल्या टप्प्यातच शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.केंद्राबाहेर कार्यकर्ते उमेदवार हे मतदारांच्या स्वागताला उभे होते. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल मतदान केंद्राबाहेर सत्ताधारी आघाडीचे बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, उदय पाटील, रणजीत पाटील हे उभे होते. तर विश्वास पाटील, बाळासाहेब चौगुले, शशिकांत खोत, एस. के. पाटील यांची उपस्थिती होती.

पिवळी टोपी विरुद्ध फरची टोपी

मतदान केंद्राबाहेर विरोधी आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते डोक्यावर पिवळी टोपी आणि गळ्यात पिवळा स्कार्फ घालून उभे होते. तर सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांनी डोक्यावर फरची टोपी घातली होती. त्यामुळे मतदान केंद्रा बाहेरच पिवळी टोपी विरुद्ध फरची टोपी असा सामना दिसला.

Edited By- Archana Banage