सरकारी कर्मचारी रस्‍त्‍यावर; बँक, महसूल, वीज, कर्मचाऱ्यांचा संप; आजही आंदोलन

हजार कोटींची उलाढाल ठप्प
Government employees on road Bank revenue electricity strike of employees kolhapur
Government employees on road Bank revenue electricity strike of employees kolhapur sakal

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. यात राष्ट्रीयीकृत्त बँकांसह महसूल, वीज व अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प राहिले; तर बँका बंद राहिल्याने ऐन मार्चअखेरीस कोट्यवधी रुपयांची उलाढालही थांबली. उद्या (ता. २९) हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील बँकांत सुमारे एक हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. या संपात राष्ट्रीयीकृत बँकांतील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले. उद्या (ता. २९) या कर्मचाऱ्यांतर्फे महावीर उद्यानात निदर्शने करण्यात येणार आहेत.

दरम्यान, बँकांचा इतर वेळी संप झाला तर सुमारे ७०० कोटींची उलाढाल ठप्प होते. पण, सध्या मार्च एंडंग सुरू असल्याने ही उलाढाल वाढली आहे. त्याचा फटका या बँकांतील ग्राहकांना बसला. बँक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, खासगीकरण थांबवावे, बुडीत कर्जाची वसुली करावी, बँकांचे विलीनीकरण थांबवावे यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यात जिल्ह्यातील नागरी बँका सहभागी झाल्या नव्हत्या; पण बहुतांश नागरी बँकांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत असल्याने त्यांच्या कामकाजावरही या आंदोलनाचा परिणाम झाला.

शनिवार-रविवार सुटीला जोडून ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने ऐन मार्चअखेरच्या गडबडीत ही संपाची हाक दिली. विधानसभेच्या पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे निदर्शने करण्यास पोलिसांनी मज्जाव घातल्याने कर्मचारी टाऊन हॉल बागेत एकत्र जमले. त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

या संपाचे नेतृत्व संजय उलपे, सुहास जाधव, जीवन करवीरकर, प्रफुल्ल जाधव, पूजा जाधव, विकास देसाई यांनी केले. या वेळी बँक कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर : अव्वल कारकून ते नायब तहसीलदार, मंडल अधिकारी ते नायब तहसीलदार पदोन्नती आणि महसूल खात्यातील रिक्त पदे भरावीत, यासह इतर मागण्यांसाठी आज महसूलमधील विभागातील लिपिक, अव्वल कारकून व वाहनचालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बागेत निदर्शने केली. या वेळी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हा संघटनेने शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध म्हणून शाहू ब्लड बॅंक येथे अनेक महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले.

जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. एका महसूल सहाय्यकाकडे दोन ते तीन संकलनाचा कार्यभार आहे. कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण आला आहे. अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहेत. २०११ मधील शासन निर्णयानुसार नायब संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित केला आहे. अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी, जिल्हा संघटनेचे सचिव अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, विलासराव कुरणे, सुनील देसाई, अकिल शेख, नारायण पाटील, विनायक लुगडे, दत्तात्रय पाडळकर, अश्‍विनी कारंडे, नंदा भोसले व नम्रता शिराणे उपस्थित होते.

वीज कंत्राटी कामगारांचा संप

कोल्हापूर : वीज कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक लेखी करार होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समितीतर्फे आज घेण्यात आला. ऊर्जामंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

उद्या (ता. २९) मुंबई येथे चर्चा केली जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. वीज कर्मचाऱ्यांवर विधायक प्रभाव असणाऱ्या सर्व ३९ संघटना संपात सामील झाल्या आहेत. महाराष्ट्रातील वीजनिर्मिती बंद व्हायला लागली. राज्य अंधारात जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ऊर्जामंत्र्यांनी सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेऊन चर्चा केली.

मागण्या अशा

  • जलविद्युत केंद्राचे खासगीकरण नको

  • केंद्र सरकारचा सुधारित विद्युत कायदा २०२१ ला विरोध करावा

  • तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे तत्काळ भरा

  • बदली धोरण रद्द करून नवीन बदली धोरण निश्चित करावे

  • कंत्राटी कामगारांना किमान ६० वर्षांपर्यंत नोकरीत संरक्षण द्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com