Govind Pansare Murder Case : सुनावणी कुठल्या न्यायालयात चालणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govind Pansare Murder Case which court will hearing be held ats kolhapur

Govind Pansare Murder Case : सुनावणी कुठल्या न्यायालयात चालणार?

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) हस्तांतरित केला आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी कोणत्या अधिकार क्षेत्रात असलेल्या न्यायालयात चालणार, याची स्पष्टता ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात उपस्थित राहून द्यावी, असे आदेश आज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला आहे.

पानसरे हत्याप्रकरणी १२ संशयितांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोघांचा शोध सुरू आहे. दहा संशयितांवर दोष निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांनी विशेष तपास पथका (एसआयटी) कडून तपास ‘एटीएस’कडे हस्तांतरित करावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली. यासंबंधीची सुनावणी आज जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयात दहाही संशयितांना पोलिस बंदोबस्तात हजर केले होते.

यासंबंधीची पुढील सुनावणी एटीएसच्या अधिकार क्षेत्रातील न्यायालयात की कोल्हापूर अधिकार क्षेत्रातील न्यायालयात होईल, याबाबत शंका निर्माण झाली. याबाबत विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे म्हणाले, ‘‘एटीएस महाराष्ट्राचे न्यायालय नेमके कोल्हापूरच्या की सोलापूरच्या अधिकार क्षेत्रात येते, यासंबंधीची माहिती एटीएसच्या प्रमुख अधिकाऱ्यांना न्यायालयात बोलवून घ्यावी लागेल. यासंबंधी त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे लागेल.’’ त्यांनी सरकारपक्षातर्फे या संबंधीचा अर्ज न्यायालयात सादर केला. न्यायालयाने तो मंजूर केला. न्यायलयाने एटीएसचे अपर पोलिस अधीक्षकांना सहा सप्टेंबरला न्यायालयात हजर राहून न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबतची शंका दूर करावी, असे आदेश दिले.

संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात एसआयटी आणि एटीएसचे अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी संशयित समीर गायकवाडला दर रविवारी एसआयटीमध्ये हजेरी देण्याचे आदेश आहेत; पण हा तपास एटीएसकडे वर्ग झाल्याने पुढील हजेरी कोठे द्यावी, याची माहिती मिळावी, अशी विनंती केली. याबाबत ॲड. राणे यांनी एसआयटी आणि एटीएस महाराष्ट्र यांच्याकडून लेखी मत मागवून घेऊन पुढील तारखेस म्हणणे सादर करू, अशी न्यायालयाला विनंती केली.

ॲड. राणे यांनी एसआयटी आणि एटीएस यांची मुंबईत अचानक बैठक बोलविण्यात आली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी हजर नसले तरी कोल्हापूर एसआयटी आणि एटीएसमध्ये काम करणारे इतर अधिकारी न्यायालयात हजर असल्याचे सांगितले. सुनावणीवेळी मेघा पानसरे, दिलीप पवार उपस्थित होते.

तावडेची कोल्हापुरात ठेवण्याची विनंती

पुणे ते कोल्हापूर प्रवास करताना त्रास होतो. सुनावणीसाठी आल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस कोल्हापुरातच ठेवण्याची विनंती संशयित वीरेंद्रसिंह तावडेने न्यायालयाकडे केली.

Web Title: Govind Pansare Murder Case Which Court Will Hearing Be Held Ats Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..