Health : लठ्ठपणा आणि मधुमेह ; हा एक अतिरेकी कुपोषणाचाच परिणाम Health obesity and diabetes esult severe malnutrition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Obesity

Health : लठ्ठपणा आणि मधुमेह ; हा एक अतिरेकी कुपोषणाचाच परिणाम

लठ्ठपणा हा एक अतिरेकी कुपोषणाचाच परिणाम आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरी भागातील भारतीय अतिपोषणामुळे कुपोषणाला सामोरे जात आहेत आणि हे कुपोषण त्यांना लठ्ठ बनवत आहे. पूर्वी मोठमोठ्या शहरात आढळणारी लठ्ठपणाची समस्या आता लहान लहान शहरे आणि खेडेगावांमध्ये सुद्धा पसरत चालली आहे.

शरीराच्या मध्यभागी पोटाच्या आतील अवयवांवर साठणारी चरबी ही आरोग्याला जास्त धोकादायक असते. यकृत, स्वादुपिंड, आतडी, मूत्रपिंड अशा अवयवांभवती साठलेली चरबी चयापचय क्रियेवर अनेक परिणाम करते आणि यातूनच निरनिराळे आजार उद्‌भवतात. या अवयवांभोवतीची चरबी जसजशी वाढत जाते तसतसा पोटाचा घेर वाढत जातो, यालाच ‘सेंट्रल ओबेसिटी’ असे म्हणतात.

अनेक गंभीर आजारांचे मूळ हे सेंट्रल ओबेसिटी आहे. या आजारांतीलच एक म्हणजे मधुमेह. भारतामध्ये दिवसेंदिवस मधुमेहींचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतास सध्या मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढले की शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अन्नाच्या पचनानंतर निर्माण होणारी शर्करा रक्तावाटे शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जाते. रक्तात इन्सुलिन योग्य प्रमाणात असेल तरच पेशींना ही साखर वापरून ऊर्जानिर्मिती करता येते. इन्सुलिनची कमतरता भासली किंवा इन्सुलिन वापरण्याची क्षमता शरीरात नसेल तर मधुमेहाची स्थिती उद्‌भवते.

मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि दुसऱ्या प्रकारामध्ये इन्सुलिनच्या कार्यात अवरोध निर्माण होतो. यातील दुसरा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो. या प्रकाराचे मुख्य कारण लठ्ठपणा हेच आहे. लठ्ठपणामुळेच इन्सुलिनच्या कार्यात अवरोध निर्माण होतो. इन्सुलिन उपलब्ध असते.

परंतु, अतिरिक्त चरबीमुळे रक्तातून मिळालेल्या शर्करेचा पेशींना वापर करता येत नाही, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते व मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. मधुमेहाचे शरीरातील प्रत्येक संस्थेवर दुष्परिणाम होतात, हे टाळण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे व आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे हे गरजेचे असते. त्याबद्दलची माहिती पुढील लेखात पाहू.