कोल्हापुरात भाजपचा टक्का वाढला म्हणता, मग 'हे' जाहीर करा - सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil
कोल्हापुरात भाजपचा टक्का वाढला म्हणता, मग 'हे' जाहीर करा - सतेज पाटील

"कोल्हापुरात भाजपचा टक्का वाढला म्हणता, मग 'हे' जाहीर करा"

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला तर भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीवर भाष्य करताना काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपला कोंडीत टाकणारा सवाल केला आहे. (If BJP claim that percentage of votes increased in Kolhapur bypoll then declare this things says Satej Patil)

पाटील म्हणाले, "कालच्या निकालातील मतांच्या आकडेवारीत आघाडीतील तीन पक्ष एकत्र असतानाही भाजपच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली, पण आघाडीची नाही असं म्हटलं जातंय. पण कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं. कश्मीर फाईल्स चित्रपटाची ३५ ते ३० हजार तिकीट मोफत वाटण्यात आली. पण हा चित्रपट बघायला जाताना ११६ रुपयांचं पेट्रोल टाकून जायला लागतं. तसेच घरी आल्यावर १,१०० रुपयांच्या सिलेंडरवर चहा तयार करुन प्यायला लागतो हे आम्ही जनतेला पटवून दिलं. महागाईचा मुद्दाही आम्ही लोकांसमोर मांडला"

टक्का वाढलाय तर 'हे' जाहीर करा

"मतांचा टक्का वाढला असं भाजपकडून वारंवार सांगितलं जात आहे. मग भाजपनं आता जाहीर करावं की, त्यांना रिपाइंची, जनसुराज्यची, सदाभाऊंच्या रयत पक्षाची, गोपिचंद पडळकरांच्या सामाजाची, शिवसंग्रामची, आवाडे गट, महाडिक गट यांची मतं मिळाली नाहीत. म्हणून मला वाटतं, भाजपची गेल्या पाच वर्षात सुरु असलेली अशस्वीतेची घौडदौड थांबवण्यासाठी त्यांनी ही निकराची लढाई लढली. पण कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचं काम इथल्या नागरिकांनी केलंय. म्हणून भाजपच्या मताचा टक्का वाढलेला सकृतदर्शनी दिसत असलं तरी त्यात पुढे सातत्य राहणार नाही. कारण आमचाही या शहराचा २५ वर्षांचा अभ्यास आहे. गेल्या २० वर्षांपासून महापालिकेच्या, आमदारकीच्या राजकारण मी आहे. त्यामुळं हा टक्का वाढल्याचं वाटतं असलं तरी पुढच्या निवडणुकांमध्ये तो राहणार नाही"

भाजपनं अत्यंत विखारी प्रचार केला

ज्या प्रभागातून सर्वाधिक मतांची अपेक्षा होती तिथून आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करु. पण भाजपनं कोल्हापुरात अत्यंत विखारी कॅपेन केलं. भाजपचे ६१ आमदार इथंच बसून होते, ७ हजार भाजपचे कार्यकर्ते होते. कोल्हापुरातील एकही लॉज किंवा हॉटेल आणि मंगल कार्यालय उपलब्ध नव्हतं. इतके लोक बाहेरुन आणून भाजपनं परिवर्तनं घडवण्याचा प्रयत्न केला. पैशाचा वारेमाप वापर केला. आज आकडेवारी ऐकली तर कान सुन्न होतील. पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते सापडले आहेत. प्रचंड ताकद भाजपनं लावली होती. पण कोल्हापूरच्या जनतेला त्यांच्यासोबत जायचं नव्हतं. त्यामुळं २५ हजारांनी त्यांची जागा यायला काही अडचण नव्हती, पण ती आली नाही. आरएसएसचे कार्यकर्ते गेल्या महिनाभरापासून इथं येऊन बसले होते. या सगळ्यांना थांबवण्याच काम आम्ही यशस्वीरित्या केलं आहे. एकूणच ज्या उलट्या बाजूनं भाजपनं हे काम केलं त्याचा विचार करता या मताधिक्यावर मी समाधानी आहे.

कोल्हापुरात महाविकास आघाडीत मोठा समन्वय

कोल्हापुरात महाविकास आघाडीत एक-दोन विषय सोडले तर मोठा समन्वय आहे. माझं राजकारण कायमचं इथलं राहिलं आहे. त्यामुळं आम्हाला पोलिंग बुथसाठी बाहेरुन माणसं आणावी लागली नाहीत. भाजपला पुण्यातून भाड्यानं माणसं आणावी लागली पोलिंग एजंटही बाहेरचे होते. हिंदुत्वाचं वातावरण रामनवमीनिमित्त भाजपनं वेगळं वातवारण तयार करायचं काम केलं, पण तरीही ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

Web Title: If Bjp Claim That Perc Of Votes Increased In Kolhapur Bypoll Then Declare This Things Says Satej Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top