
‘गोकुळ’च्या संकलनात घट
कोल्हापूर : गेल्या महिनाभरात गोकुळ दूध संकलनात मोठी घट झाली आहे. घटनेची गंभीर दखल संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी घेतली असून आज सर्व विभागांचे प्रमुख, सुपरवायझर यांच्या बैठकीत कारणांचा शोध घेण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात ही बैठक झाली.
जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ‘गोकुळ’च्या संकलनात सुमारे लाखभर लिटरची घट झाली आहे. एकीकडे दैनंदिन २० लाख लिटर संकलनाचा संकल्प केला असता त्यात घट होत आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर घट आढळली आहे. त्याचा लेखाजोखा श्री. पाटील यांनी आजच्या बैठकीत मांडला.या काळात जनावरांकडून दूध कमी दिले जाते, त्यात चाऱ्याची टंचाई आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे चाऱ्याची लागवड करता आलेली नाही. दुसरीकडे काही खासगी संघांचा जिल्ह्यात शिरकाव झाला असून त्यांच्याकडून जादा दराने दुधाची खरेदी सुरू आहे. या सगळ्यांचा परिणाम संकलनावर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच बैठकीत मार्केटिंग विभागावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या.
दूध संस्थांतून चहागाड्या, घरगुती दिले जाणारे दूध रोखण्याची सूचना बैठकीत केली. संस्थांतून बाहेर जाणारे दूध पुन्हा खरेदी करता येते का, याचीही चाचपणी करण्याचे आदेश दिले. राज्यात सर्वाधिक दूध दर ‘गोकुळ’ देत असताना संकलनात घट कशी होते, असा सवालही संचालकांनी उपस्थित केला.बैठकीला ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, कार्यकारी संचालक गोडबोले व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्याबाहेरील संघ दाखल
‘गोकुळ’सह जिल्ह्यात अमूल, सुमुलसह इतर जिल्ह्यातील काही मोठ्या खासगी संघांकडून कोल्हापुरात दूध खरेदी केले जात आहे. ‘गोकुळ’पेक्षा प्रतिलिटर चार रुपये जादा दर देऊन ही खरेदी होत असल्याने संघाकडे होणारा दूध पुरवठा कमी झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संघांकडून दूध खरेदी केली जाते, असेही सांगण्यात आले.
ही घट नैसर्गिक : पाटील
या बैठकीबाबत अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘या काळात जनावरांकडूनच दूध कमी दिले जाते, ही घट नैसर्गिक आहे. त्या मागच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश सुपरवायझर यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.’