esakal | व्यापारी बैठकीतील निर्णयांचा अंमल ; जिल्हाधिकारी रेखावार | Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

collector kolhapur

व्यापारी बैठकीतील निर्णयांचा अंमल ; जिल्हाधिकारी रेखावार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर ते पापाची तिकटी, महाद्वार रोड व्यापाऱ्यांसह फेरीवाल्यांसाठी शुक्रवारपासूनच खुला आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल रात्रीत उभा केला आहे. कालच्या बैठकीतील सर्व निर्णयांचा अंमल सुरू झाला आहे. मुखदर्शनासाठी गर्दी असल्यामुळेच बिनखांबी मंदिर ते अंबाबाई मंदिर परिसरातील बॅरिकेड महत्त्वाचे आहेत. हा रस्ता केवळ रुग्णवाहिका, अग्निशमन बंबाव्यतिरिक्त कोणालाही खुला करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पहिल्या दिवशी साडेसहाशे भाविक प्रत्येक तासाला होते. दुसऱ्या दिवशी ९०० होते. आज तिसऱ्या दिवशी १२०० होते. उद्यापासून ते दीड हजार होणार आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवायचे झाले तर साधारण ९ हजार फुटांचे बॅरिकेड बनवावे लागेल. त्यामुळे नगारखान्याच्या (भवानी मंडप) आतच हे शक्य नाही. म्हणून शिवाजी चौकातूनच रांग सुरू केली आहे.’’ काहींच्या वेळेत कमी-जास्त होते. त्यामुळे एकाच वेळी अधिक संख्या होते. म्हणूनच ही रांग नेहमीप्रमाणेच ठेवल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बॅरिकेड आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘‘फेरीवाले, व्यापारी यांनी बॅरिकेडबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानंतर काल आमदार चंद्रकांत जाधव, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात गुजरी येथे पूल बनविण्याचा निर्णय झाला. तो पूल एका रात्रीत उभा केला आहे.

सर्व बॅरिकेड नागरिकांना पायी जाण्यासाठी खुले आहेत. दोन्ही दिशेला दोन्ही बाजूने लोकांना पायी जाणे शक्य आहे. बिनखांबी ते अंबाबाई मंदिर या ठिकाणी कोणत्याही फेरीवाल्यांना बसविता येणार नाही. कारण महाद्वारवरील मुखदर्शनाची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची आवश्‍यकता आहे. तसेच अग्निशमन आणि रुग्णवाहिकेसाठी दुसरी बाजू मोकळी ठेवावी लागते.

महाद्वार ते पापाची तिकटी या सर्व ठिकाणी फेरीवाले बसलेले आहेत. दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी बॅरिकेड लावतो, त्याच ठिकाणीच यावेळीही लावलेले आहेत. काल बैठकीच्या ठिकाणावरूनच पोलिसांनी पायी जाण्यासाठी बॅरिकेड खुले करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याचा अंमल सुरू झाला आहे.

शिवाजी चौक ते भवानी मंडप या रस्त्यावर मॅटिंग टाकले आहे. उन्हाचा आणि पावसाचा त्रास होऊ नये, म्‍हणून तेथे मंडप उभारणीच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांनी इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शन रांगेत यूज ॲण्ड थ्रो ग्लासमध्ये पाण्याची व्‍यवस्था उपलब्ध केली जाईल.

- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

loading image
go to top