सांगलीत प्राप्तिकरचे छापे

बजरंग खरमाटेंशी संबंधित मालमत्ता चौकशी सुरू
Income Tax Department
Income Tax Departmentesakal

सांगली: बहुचर्चित प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याशी संबंधित असलेल्या वंजारवाडी, शंभरफुटी रस्ता, बेडग, एमआयडीसी येथील बंगले व कारखान्यावर आज पहाटेच्या सुमारास प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. स्थानिक पोलिस या छाप्यापासून अनभिज्ञ होते. केंद्रीय राखीव पोलिसांच्या मदतीने एकाचवेळी हे छापे टाकून तपासणी करण्यात आली. दुपारनंतर या कारवाईची जिल्ह्यात चर्चा पसरली होती, परंतु छाप्याबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. छाप्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे व अन्य बाबी जप्त करण्यात आल्या आहेत.

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी मोठ्याप्रमाणात बेनामी मालमत्ता मिळवली असल्याची तक्रार यापूर्वीच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सांगली दौऱ्यावर असताना वंजारवाडी येथील बजरंग खरमाटे यांच्या आलिशान बंगल्याची पाहणी केली होती. तेथून त्यांनी सेल्फी घेऊन खरमाटे यांच्याकडे इतकी मालमत्ता कोठून आली, असा सवाल करत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. श्री. सोमय्या यांनी तेव्हा परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केला होता.

तीन ते चार महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रकरणावर धुरळा बसला होता. त्यानंतर आज पहाटे तीन ते चारच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा ताफाच सांगली जिल्ह्यात दाखल झाला. स्थानिक पोलिसांना कल्पना न देता केंद्रीय राखीव पोलिसांच्या मदतीने एकाचवेळी शंभरफुटी रस्त्यावरील बंगला, वंजारवाडी, एमआयडीसी येथील कारखाना, बेडग (ता. मिरज) येथे छापे टाकले. त्यानंतर चौकशी सुरू केली.

आज सकाळी छापे टाकलेल्या परिसरात केंद्रीय राखीव पोलिस पाहून तसेच आतमध्ये अधिकाऱ्यांचा ताफा पाहून छापे पडल्याची चर्चा रंगली. काही चौकस नागरिकांना हा प्रकार वेगळाच वाटला. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना प्राप्तिकरचे छापे पडल्याचे समजले. केंद्रीय पोलिस पाहून स्थानिक पोलिस तेथून माघारी फिरले. दुपारी बारापर्यंत एकाचवेळी चार ठिकाणी तपासणी सुरू होती. चौकस नागरिक फिरकू नयेत म्हणून केंद्रीय पोलिस सज्ज होते.

दरम्यान, दुपारनंतर जिल्ह्यात ईडीचे छापे पडल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे बरेचजण एकमेकांना विचारत होते. तसेच छापा टाकणारे पथक परजिल्ह्यातील होते. बऱ्याच चौकशीनंतर छापे ईडीचे नसून प्राप्तिकरचे असल्याचे समजले. परिवहन अधिकारी खरमाटे यांच्याशी संबंधितांवर हे छापे असल्याचे उशिराने समजले. छाप्याबाबत गोपनीयता बाळगली असल्यामुळे नेमके काय हाती लागले, हे समजू शकले नाही. दरम्यान, याबाबत बजरंग खरमाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com