esakal | Kolhapur : 'गांधींच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

KOLHAPUR

'गांधींच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : स्वार्थ, चंगळवाद बाजूला ठेवून देशाच्या भल्याचा थोडा जरी विचार केला तर महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, लेखक व सामाजिक कार्यकर्ते तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे केले. देशातील वाढती विषमता व प्रत्येक बाबीचे उत्सवीकरणाला आलेले उधाण चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि महात्मा गांधी’ विषयावरील विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

श्री. गांधी म्हणाले, "महात्मा गांधींची स्वप्नातल्या भारताची संकल्पना आदर्श रामराज्याची आहे. यामध्ये गांधीजींना एक असे प्रजासत्ताक अभिप्रेत आहे, ज्यामध्ये दुर्बलातल्या दुर्बल व्यक्तीच्या आवाजाला महत्त्व असेल. ज्यात गरीब-श्रीमंत, धर्म-जात, प्रांत-भाषा असा कोणताही भेद असणार नाही. समताधिष्ठित समाज असेल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. मात्र, सध्या श्रीमंतांकडे एवढी अमाप संपत्ती आहे की, इतक्या प्रचंड ऐश्वर्याचे करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, तर दुसरीकडे गरीबाला दोन वेळची भूक भागविण्याची भ्रांत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षानंतर सामोरी आलेली ही विषमता अत्यंत क्लेषकारक व चिंताजनक आहे."

ते म्हणाले, "महामारीच्या कालखंडात या विषमतेचे प्रत्यंतर प्रकर्षाने आले. जिथे लोकांना रोजगार आहेत, तिथे त्यांना आश्रय नाही; आणि जिथे आश्रय आहे, तिथे रोजगार नाहीत. त्यामुळे हजारो मैलांची पायपीट करून आपापल्या आश्रयस्थानी परतण्याचे केविलवाणे जिणे त्यांच्या वाट्याला आले. बापूंच्या स्वप्नातील भारतापासून घेतलेली फारकतच आपल्याला येथे दिसून येते. केवळ मतदान केले की झाले, असा बेजबाबदारपणा आपल्यात आला आहे. प्रत्यक्षात जगण्यामध्ये श्वासाचे जे महत्त्व आहे, तेच प्रजासत्ताकात नागरिकांचे आहे, हेच आपण विसरून गेलो आहोत." केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

श्री. गांधी म्हणतात

  1. राजधानीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रती उदासीनता चिंताजनक

  2. देशातील मध्यमवर्गाची वागणूक बांडगुळाप्रमाणे

  3. विकासाच्या संकल्पनेचाही फेरविचार व्हावा

  4. शेतकऱ्यांना मिळणारी कामे हलक्या दर्जाची

  5. विकास प्रक्रियेत बलिदान देणारा एक घटक आणि लाभार्थी दुसराच

  6. विकास प्रक्रियेत उद्योजक व विकसकांबरोबर वाटाघाटी करण्याचे अधिकार गावकऱ्यांना का नाहीत?

  7. बड्यांच्या जमिनींना यात धक्का का नाही?

  8. सत्यापासून पलायन करण्याची वृत्ती ही राष्ट्राची दुर्बलता

loading image
go to top