
स्टार्टअपसाठी पायाभूत सुविधा निर्माण करूया
कोल्हापूर : राजर्षी शाहूंनी राज्यकारभार करताना अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या. त्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वात स्टार्टअप-इनोव्हेशन फेस्टिव्हलचा उपक्रम कौतुकास्पदच आहे; मात्र या क्षेत्रासाठी आवश्यक सर्व त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याच पर्वाच्या निमित्ताने सारे मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन आज ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी केले. लोकराजा स्टार्टअप- इनोव्हेशन फेस्टिव्हलमध्ये आज झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘कोल्हापूरनं नेहमीच विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या आणि त्या यशस्वी केल्या. राजर्षी शाहूंच्या कारकिर्दीत तर जगभरातील नव्या गोष्टी स्वीकारताना लोकसहभागातून अनेक नवसंकल्पना पुढे आल्या. गुळाच्या लाकडी घाण्यामुळे होणारे अपघात कमी होण्यासाठी नव्या यंत्राची निर्मिती झाली पाहिजे, असा राजर्षी शाहूंनी आग्रह धरला आणि त्यासाठी लोकांतूनच नव्या संकल्पना पुढे याव्यात, यासाठी स्पर्धा जाहीर केली होती. आज शंभर वर्षानंतर तंत्रज्ञान खूप झपाट्याने बदलले असले तरी स्टार्टअप- इनोव्हेशनचा विचार करता त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जावे लागते आहे.’’
स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक नवसंकल्पना आता पुढे येत आहेत. मात्र सुरू झालेली अनेक स्टार्टअप बंद का पडतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सर्वच पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असून या वर्षात त्यावरच अधिक भर देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
मनोरमा इन्फोसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक, सीईओ अश्विनी दानिगोंड यांनी ‘मनोरमार’ची यशकथा यावेळी उलगडली. ‘मनोरमा‘च्या निमित्ताने कोल्हापूरचे नाव जगभरात झळकले. मात्र, मेट्रोसिटी आणि कोल्हापुरातून काम करताना येताना नेमक्या कोणत्या अडचणी आहेत आणि त्यावर कशी मात केली, याविषयीही त्यांनी सविस्तर विवेचन केले.
मयुरा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक रवि डोली यांनी मयुरा स्टीलची यशकथा सांगितली. उद्योगांत यांत्रिकीकरणापेक्षा कुशल मनुष्यबळाला अधिक भर दिला पाहिजे, हा आग्रह पहिल्यापासून धरला असून उद्योगांतून एकूणच समाजाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ‘सीआयआय’चे अक्षय बन्सल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे वरिष्ठ समूह संचालक विक्रम सराफ यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन केले. सीए सतीश डकरे यांनी स्वागत केले. कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त संजय माळी यांनी आभार मानले. हर्षवर्धन पंडित यांनी हा संवाद आणखी खुलवला.
Web Title: Indian Startup News Infrastructure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..