पिठावर कर लावणाऱ्या सरकारला जावं लागेल; बाळासाहेब थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress balasaheb thorat criticism on bjp

पिठावर कर लावणाऱ्या सरकारला जावं लागेल; बाळासाहेब थोरात

कुडित्रे : इंग्रजांनी मीठावर कर बसवला, यांनी पिठावर कर बसवला, इंग्रजांना जावं लागलं, आता यांनाही जावं लागेल, असा खरपूस समाचार माजी महसूलमंत्री व काँग्रेस पक्ष सभागृह नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाव न घेता घेतला. दिंडनेर्ली येथे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्यानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

श्री. थोरात यांना वाढत्या महागाईवर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत नाही, यावर मत विचारले असता ते म्हणाले, ‘धान्यावर, पिठावर, पेन, पेन्सिल, खोडरबर सर्वांवर जीएसटी लावली आहे. सर्वसामान्य नागरिक बेहाल झाला आहे. हा सर्वसामान्य माणूसच मतपेटीतून व्यक्त होईल.’

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गट करत असलेली टीका आता सत्तेमुळे होत असावी; पण आपल्यासाठी कुणी काही केलं तर त्याची जाणीव ठेवायची असते. त्यांनी असे बोलू नये. त्यांच्या जीवनात ठाकरे कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. त्याची आठवण ठेवावी असे, थोरात यांनी स्पष्ट केले.

गोविंदा पथक आणि गोविंदा संस्कृतीचा भाग आहे; परंतु नोकरीत आरक्षण हा विषय वेगळा आहे. त्याचा फेरविचार करावा. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी वाजणारच, असे सांगितले आहे. यावर सवंग लोकप्रियतेसाठी डॉल्बीसारख्या गोष्टीचा निर्णय घेऊ नये. आवाजाची मर्यादा पाळली पाहिजेच, असे श्री. थोरात म्हणाले.

शिर्डीत अतिरेकी संघटनेशी संबंध असलेल्या एकावर कारवाईबाबत ते म्हणाले, ‘केंद्रीय तपास यंत्रणेचे तपास करण्याचे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी यंत्रणा सक्रिय केली आहे. बोटीत एके ४७ सारख्या बंदुका मिळून आल्या. यामुळे आपण आपली काळजी घ्यावी; पण काळजी करू नये.’

पावसाळी अधिवेशनात पहिलाच प्रश्न राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. याचा अर्थ त्यांचा अभ्यास कमी आहे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची इतिहासात नोंद होईल.

जाणीवपूर्वक गुन्हे

सत्ता बदल झाल्यामुळे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. आपल्या चुलत भावावर दाखल झालेला गुन्हा त्याचाच एक भाग आहे. तिथल्या जनतेला माहिती आहे सत्य काय आहे. ते अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला.