
कोल्हापूर : विद्यापीठात आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिसंवाद ;जतीन देसाई
कोल्हापूर : बहुसांस्कृतिकतेचा प्रश्न सर्व दक्षिण आशियाई देशांचा आहे, हिंदुत्ववाद्यांना केवळ बहुसंख्य लोकांची हुकूमशाही हवी असून बहुसंख्याकवाद धोक्याचा आहे, असे मत जतीन देसाई यांनी आज व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा विभाग, मराठी अधिविभाग व रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज (मॉस्को, रशिया) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दक्षिण आशिया : ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध’ अंतर्गत ‘दक्षिण आशिया: समकालीन गतिमान वास्तव – २०२२’ विषयावरील आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय आॅनलाईन परिसंवादात ते बोलत होते.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात ‘दक्षिण आशिया : वांशिक बहुलवाद, सांस्कृतिक विविधता आणि बहुसांस्कृतिकते समोरील आव्हाने’ विषयावर त्यांनी संवाद साधला. श्री. देसाई म्हणाले, “आजच्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याची चर्चा करणे महत्त्वाचे आहे. गांधी स्वतः एक सनातन हिंदू होते. पण, पद्धतशीरपणे कट रचून त्यांना ठार करण्याच्या आठ प्रयत्नानंतर ३० जानेवारीला त्यांना ठार मारले. गांधीजींना बहुसांस्कृतिकता, लोकशाही मान्य होती. पाकिस्तानात पंजाब्यांचा बहुसंख्यांकवाद सिंध चळवळीला दडपतो. तिथेही अनेकांवर देशद्रोहाचे खटले केले जातात. पख्तुनांवर दडपशाही करण्यात येते. बलुची राष्ट्रवाद देखील काश्मीरप्रमाणे तिथे ज्वलंत प्रश्न बनला आहे."
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
ते म्हणाले, ‘‘२००९ मध्ये एलटीटीईची चळवळ श्रीलंकेमध्ये मोडून काढली. आता तिथल्या तमिळ जनतेकडे कुणी लक्ष देत नाही. रोहिंग्या लोकांवर ब्रह्मदेशात दडपशाही सुरू आहे. तीन लाख रोहिंग्याना बांगलादेशात पळून जावे लागले. त्यांना सहानुभूती दाखवण्याऐवजी भारत कठोर भूमिका घेत आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्या हिंदू आणि शीख यांना फक्त निवारा मिळेल, असे जाहीर केले आहे. डॉ. अविनाश पांडे व डॉ. परिमल माया सुधाकर यांनी या विषयावर मांडणी केली.’’‘दक्षिण आशियातील साहित्यिक अनुवादाची भूमिका’ सत्रात डॉ. सईदा हमीद, डॉ. सचिन केतकर, फर्वा शफकत (पाकिस्तान) यांनी मार्गदर्शन केले. ‘दक्षिण आशियातील लिंगभाव’ सत्रात डॉ. मीना शेषू, डॉ. अझरा सईद (पाकिस्तान) यांनी विचार मांडले. या सत्राच्या अध्यक्ष प्रा. उमा चक्रवर्ती होत्या.
अफगाणिस्तानवर भुकेने मरण्याची वेळ
श्री देसाई म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानातील ताजिक लोकांना ताजिकिस्तानात आसरा घ्यावा लागतो. भारत पूर्वी ताजिकींना पाठिंबा देत असे. हल्ली ते थांबवले आहे. अफगाणिस्तानवर भुकेने मरण्याची वेळ आली आहे. भारत मदत पाठवायला तयार आहे, मात्र पाकिस्तानातून कोणत्या मार्गाने, ती जावी याबद्दल निर्णय होत नाही.’’
Web Title: Jatin Desai International Multidisciplinary Seminar University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..