गरिबांसाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे ; जयंत पाटील यांचे आवाहन

गरिबांसाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे ;  जयंत पाटील यांचे आवाहन

सांगली : गरीबातील गरीब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह होती, तिसरी लाट यापेक्षाही गंभीर असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऑक्सिजन उलब्धतेच्या मर्यादेत रुग्णसंख्या रोखण्यासाठी राबविणत येणाऱ्या उपाययोजना सर्वांनी मिळून काटेकोरपणे पाळूया, ऑक्सिजन क्षमतेपेक्षा रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज पडेल त्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी समजून संपुर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महानगरपालिका आयुक्त नितिन कापडनिस आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने सन 2005,2019 आणि आता जुलै 2021 चाही महापूर आणि अतिवृष्टी अनुभवली. हवामान खात्याने दिलेल्या अतिपावसाचा इशारा गांभिर्याने घेत प्रशासनाबरोबरच आपण सर्वजनच सुरुवातीपासून सजग होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील समन्वयामुळे महाप्रलय टळला. या महापुरात जिल्ह्यात एकही जिवीतहानी झाली नाही हे प्रशासनाचे फार मोठे यश आहे.

महापुराचा फटका जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 103 गावांना मोठ्या प्रमाणावर बसला. जवळपास 2 लाख नागरिक आणि 36 हजार जनावरे स्थलांतरीत करावी लागली. 247 गावांमधील 41 हजार हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झाले आहे. तर 40 हजार कुटुंबे पूरबाधित झाली आहेत. व्यापार, उद्योग, रस्ते, पूल, पशुधन,घरे यांचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. यासर्वांचे पंचनामे जवळपास पुर्ण होत आले आहेत. प्रत्येक पूरबाधिताला त्यांच्या हक्काचे अन्न-धान्य मिळावे याबाबत पुरवठा विभागाला दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरातून झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी तसेच महापूराच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट महाभयानक असल्याने सर्वच स्तरावरची आर्थिक स्थिती अडचणीची असली तरी शासन पूरबाधितांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपत्तीग्रस्तांसाठी शासनाने एन.डी.आर.एफ च्या निकषांच्या पुढे जावून मदतीचे धोरण अवलंबिले आहे. या प्रसंगी त्यांनी समाजातील सर्व दानशूर, सेवाभावी वृत्तीच्या लोकांनी पूरग्रस्त पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.

|

पूढे ते म्हणाले, कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. याची जाणिव प्रत्येकानेच ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणाही सक्षम करण्यावर आपण भर दिला आहे. जस-जशी रुग्णसंख्या वाढेल तस-तसे शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयेही कोरोना उपचारासाठी अधिग्रहित करण्याबाबत यंत्रणेला सूचित केले आहे. कितीही आरोग्य सुविधा निर्माण केल्या तरी त्याला मर्यादा आहेत आणि संकट फार मोठे आहे याची जाणिव सर्वांनीच ठेवून जबाबदारीने राहणे आवश्यक आहे. पहिल्या पेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचे स्वरुप अधिक भयावह होते हे लक्षात घेऊन आता तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिक खबरदारी घ्यावी लागेल. रुग्णसंख्या ऑक्सिजन मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल याची जाणिव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील 65 गावे पाण्यापासून पुर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरुपी सिंचनाखाली आणण्यासाठी 6 टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळविले आहे. जत तालुका दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या 141 शाळांमधून ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या 141 शाळांकरीता 166 नवीन वर्ग खोल्या मंजूर केल्या आहेत. तर 130 शाळांमध्ये 917 वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 141 मॉडेल स्कुलमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्ता विकास सुरु आहे. जिल्ह्यातील पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईनव्दारे शिक्षण प्रवाहात ठेवण्यात येत आहे. शासन आणि प्रशासन यांची मोट व्यवस्थित बांधली जावून विकासाची फळे शेवटच्या घटकांपर्यत पोहचतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणलेल्या उत्कृष्ट तपासबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलेल्या सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचा सत्कार करण्यात आला. महाआवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या ग्रामपंचायत भूड, ता- खानापूर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम आलेल्या ग्रामपंचायत जाखापूर ता-कवठेमहांकाळ व प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्यपुरस्कृत आवास योजनेत प्रथम तालुका म्हणून कवठेमहांकाळ तालुक्याचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विवेकानंद हॉस्पिटल बामनोळी या रुग्णालयाला पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com