esakal | जोतिबाच्या जागराला डोंगर हाऊस फूल्ल; दिड लाख भाविक | Jotiba
sakal

बोलून बातमी शोधा

Jotiba

जोतिबाच्या जागराला डोंगर हाऊस फूल्ल; दिड लाख भाविक

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभल महादेव नंदी, बद्रिकेदार चोपडाईदेवी, यमाईदेवी, काळ भैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील जोतिबा देवाचा जागर सोहळा आज दोन वर्षानंतर अमाप उत्साहात झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात या राज्यातील सुमारे दीड लाख भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. दिवसभर भाविकांच्या झुंडी येत होत्या. डोंगर आज चांगभलच्या जयघोषाने दणाणून गेला.

डोंगरावर सप्तमीला जोतिबा देवाचा प्रकट दिन असतो. श्री काळभैरव देवाने सुरू केलेले एक वर्तुळ (नवरात्रोत्सवाचे) जोतिबा जागरा दिवशी पूर्ण केले. तो दिवस सातवा व सप्तमीचा होता. तेव्हापासून जोतिबा देवाचा जागर सातव्या दिवशी सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. या जागराचे वैशिष्ट्ये असे की जोतिबा देवाचा जागर झाल्याशिवाय करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीसह इतर शक्ती देवतांचा जागर होत नाही.

आज श्री जोतिबा देवाची जागरानिमित्त कमळ पुष्पातील दख्खनचा राजा रूपातील बैठी अलंकारीक महापूजा बांधण्यात आली. समस्त दहा गावकर व पुजाऱ्यानी ही पूजा बांधली. आज जागर असल्यामुळे अगदी पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेला. भर उन्हातून भाविकांनी ई-पास पध्दतीने रांगेतून दर्शन घेतले. ठाकरे मिटके गल्लीपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या. मुख्य मंदिरात आज खोबरे, वाटी, सिताफळ, कवंटाळ यांचे तोरण बांधण्याचा विधी झाला. हा मान कुशीरे तर्फ ठाणे पोहाळे तर्फ आळते येथील ग्रामस्थांना आहे.

हेही वाचा: यंदा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होणार

आज सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने फलाहाराची चार ताटे मूळमाया यमाई देवीच्या मंदिराकडे सवाद्य मिरवणुकीने नेण्यात आली. यावेळी देवस्थानचे अधीक्षक महादेव दिंडे, सरपंच राधा बुणे, पुजारी सर्व देवसेवक ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते. जागरानिमित्त आज ३३ कोटी देवांनी जोतिबा देवाचे वाहन म्हणजे सर्वगुणसंपन्न उन्मेश नावाचा अश्व (घोडा) अर्पण केला .

अश्‍वाची श्रींच्या मूर्ती समोर आज पूजा करण्यात आली. रात्री मुख्य मंदिरात श्री चोपडाईदेवी यमाईदेवी काळभैरव या सर्व देवांना त्यांचे वाहन अर्पण करण्याचा विधी झाला. जागरा निमित्त मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले होते. मंदिरात भजन कीर्तन भक्तीगीते यांचा कार्यक्रम झाला.

आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पण अपुरा बंदोबस्त असल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला. यमाई मंदिर परिसरात रस्ता अपुरा असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या ठिकाणी एकही पोलीस नव्हता. तासभरानंतर भाविकांना आपली वाहने काढण्यासाठी ताटकळत रस्त्यावर थांबावे लागले. डोंगरावर आज हि ई-पास दर्शन पध्दतीचा बोजवारा उडाला. त्यामुळे भाविकांत मोठी नाराजी होती.आज कित्येक भाविकांनी मुख दर्शन व कळस दर्शन करुन परतीचा मार्ग धरला.

loading image
go to top