esakal | जोतिबाच्या चैत्र यात्रेत सातव्या क्रमांकाचा मान 'या' गावच्या सासनकाठीचाच

बोलून बातमी शोधा

जोतिबाच्या चैत्र  यात्रेत सातव्या क्रमांकाचा मान 'या' गावच्या सासनकाठीचाच
जोतिबाच्या चैत्र यात्रेत सातव्या क्रमांकाचा मान 'या' गावच्या सासनकाठीचाच
sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : कराड पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर किवळ हे गाव आहे. या गावांमध्ये संत नावजीनाथ होऊन गेले. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेत सातव्या क्रमांकाचा मान या गावच्या सासनकाठीचा असून जोतिबा देवाच्या पालखीच्या पुढे उभे राहण्याचा मान या सासन काठीचा आहे. जोतिबा डोंगरावरचे ग्रामस्थ, पुजारी मोठ्या भक्तिभावाने या सासन काठीची पूजा करतात. दर वर्षी या गावात चैत्र यात्रेसाठी जाण्याची जोरात सुरू असते. गावातील सुमारे दीड हजार ग्रामस्थ यात्रेसाठी या काठी सोबत येतात .

बार्शीतील हलगीचा ठेका , झांजपथक , सनईच्या सुरावर वाजत गाजत व भव्य मिरवणुकीने ही काठी डोंगरावर दाखल होते .किवळ गावच्या सासन काठीचा पोशाख हा सोनेरी रंगाचा असून काठीवर घोडा, डमरू , शाहु कालीन ताम्रपत्र बांधलेले असते . त्यामुळे काठी देखणी व उठावदार दिसते.

किवळचे ग्रामस्थ सांगतात की, पूर्वी किवळ गावचे संत नावजीनाथ बुवा जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी दररोज न चुकता दर्शनासाठी पायी जात . असे ते कित्येक वर्षे पायी जात होते .त्यामुळे जोतिबा देवास त्यांची दया आली. व ते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी किवळ गावी गोसावीच्या रूपात दाखल झाले. व त्यांनी नावजी नाथांची भेट घेतली. तेव्हा पासून किवळ गावची नावजी बुवांची सासनकाठी म्हणून जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेत दाखल होऊ लागली .

डोंगरावरही पूर्वीपासून या सासन काठीस मोठा मान आहे. नवसाला पावणारी सासन काठी म्हणून सर्व ग्रामस्थ पुजारी या काठीस नारळांची ,पैशांची तोरणे बांधतात. तसेच गुलाल खोबरे ही उधळतात तसेच गावच्या वेशीपर्यंत या सासनकाठीला निरोप देण्यासाठी सर्व गाव एकत्र येते. कार्तिक पौर्णिमे दिवशी किवळ गावची यात्रा असते. जोतिबा डोंगरची चैत्र यात्रा जस जशी जवळ येऊ लागली की किवळ ग्रामस्थांना जोतिबा देवाच्या दर्शनाची ओढ लागते .

गेल्या वर्षापासून कोरोना संसर्गामुळे सासन काठी डोंगरावर गेलेली नाही. सर्व धार्मीक विधी गावातच केले जातात . दरम्यान,या गावातील मुख्य मंदिरासमोर एक पार आहे. त्या पारावरच गावातील लग्न समारंभ केले जातात. गावातील व्यक्ती किती मोठी असो वा लहान अक्षदा या पारावरच टाकल्या जातात. हे गावचे पूर्वापार चालत आलेले वैशिष्टय आहे.

किवळ गावात लोकवर्गणीतून ८५ लाखाचे संत नावजी नाथांचे भव्य मंदिर बांधले असून या मंदिराचा जीर्णोद्धार करताना गावातील अठराशे माहेरवाशीनींना साडी चोळी , देऊन त्यांची ओटी भरली. त्याचबरोबर त्यांना आठवण म्हणून एक झाड व एक बॅग देण्यात आली. त्यावर झाडे लावा झाडे जगवा, लेक वाचवा देश वाचवा, हा संदेश लिहीण्यात आला होता.

संत नावजी बुवांच्या कृपा आशीर्वादामुळे आमच्या गावात विकास होत आहे. गावात सुख , शांती समाधान लाभत आहे . जोतिबा चैत्र यात्रेत आमच्या काठीस मोठा मान आहे. काठीचे डोंगरावर जोरदार स्वागत होते. मानाची काठी व नवसाला पावणारी काठी म्हणून ती प्रसिद्ध आहे. यंदा कोरोनामुळे आम्ही धार्मीक विधी गावात सर्व नियम पाळून करणार आहोत .

रामराव साळुंखे, किवळ,सचिव ,संत नावजीनाथ देवस्थान कमिटी , किवळ ता. कराड

Edited By- Archana Banage