कागल : कर्जफेडीसाठी २२ लाखांच्या लुटीचा बनाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

looted

कागल : कर्जफेडीसाठी २२ लाखांच्या लुटीचा बनाव

कागल : कागल - पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री एका चांदी व्यावसायिकाला अडवून २२ लाख रुपये लुटण्यात आले. या जबरी लुटमारीचा छडा कागल पोलिसांनी बारा तासांमध्ये लावला. एका निलंबित पोलिसाच्या मदतीने लुटीचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी फिर्यादी चांदी व्यावसायिक महेश जगन्नाथ काटकर (वय ३३, रा. अभयचीवाडी, ता. कऱ्हाड) व संशयित सुशीलकुमार ऊर्फ सनी मुरलीधर भांबुरे (३३, रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) या दोघांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव यांनी सांगितले. संशयित निलंबित पोलिस शिवानंद बोबडे (रा. तासगाव) पसार झाला आहे. १५ लाख रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी चांदी व्यावसायिकानेच हा बनाव केल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सेलम (तामिळनाडू) येथून चांदीचा माल हुपरी येथील चांदी व्यावसायिकांना देण्याचे काम काटकर करतो. त्याने शुक्रवारी (ता. १३) दुपारी हुपरी येथे माल देऊन २२ लाख रुपये व कच्ची चांदी घेतली. तो, स्वतःच्या मोटारीमधून रात्री नऊच्या सुमारास सेलमकडे चालला होता. त्याच्या सोबत सूरज जगताप (रा. कऱ्हाड), संजय ज्ञानदेव ओवे व राजकुमार (दोघे रा. सेलम) होते.

चौघे जण कागल - पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून महामार्गाकडे जात होते. ते रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ आले असता शिवानंद बोबडे व सुशीलकुमार भांबुरे यांनी त्यांच्या मोटारीपुढे आडवी गाडी मारून थांबविले. आम्ही पोलिस असून कागदपत्रे दाखविण्याची धमकी दिली व गाडीच्या सुरक्षित कप्प्यातील २२ लाख रुपये रक्कम जबरीने घेऊन गेले. हा प्रकार त्या रात्री नऊ ते साडेअकरा या दरम्यान घडला. याची तक्रार देण्यासाठी काटकर प्रथम हुपरी, नंतर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडे गेले. हद्दीवरून कागल पोलिस ठाण्यात आला. तेथे पहाटे पाच वाजता नोंद करण्यात आली.

फोन रेकॉर्डवरून तपास करीत कागल पोलिसांनी बारा तासात गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यातील २१ लाख रुपये व तीन लाखांची मोटार असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यांनी केला तपास हा गुन्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अजितकुमार जाधव, सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, विजय पाटील, महादेव बिरंजे, रणजित कांबळे, विनायक औताडे, मोहन माटुंगे, आसमा जमादार, प्रभाकर पुजारी, रवी साळुंखे यांनी उघडकीस आणला.

कागल : कागल पोलिसांनी २२ लाखांच्या लुटीचा छडा लावला. संशयितांना रकमेसह ताब्यात घेतल्यानंतर कागलचे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव आणि पथक.

रक्कम मोटारीतून जप्त

पोलिसांनी सांगितले की, काटकरने त्याच्याकडील मोटारीतील सेफ्टी लॉकरमध्ये दागिने विक्रीची बावीस लाख रुपये रक्कम ठेवली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुशीलकुमार भांबुरे याला पकडण्यासाठी जाळे लावले. सुशीलकुमार पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सापडला. त्याच्याकडे असलेली गाडी व त्यातील रोख २१ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, निलंबित पोलिस संशयित शिवानंद बोबडे शंका आल्याने एक लाख रुपयांसह पसार झाला. बोबडे सांगली पोलिस मुख्यालयातील कर्मचारी असून सध्या तो निलंबित होता. त्याला कालच पोलिस मुख्यालयात कामावर हजर राहण्यास सांगितले होते.

Web Title: Kagal Facilitator 22 Lakh Loan Repayment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top