
निपाणी येथे शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांच्याऐवजी उत्तम पाटील (Uttam Patil) यांना तर कुडची येथे पी. राजीव यांच्याऐवजी शाम घाटगे यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मंत्री जोल्लेंना डावलून निपाणीतून उत्तम पाटलांना उमेदवारी? अण्णासाहेब जोल्लेंनी जारकीहोळींना चांगलंच सुनावलं!
चिक्कोडी : भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघात माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांची ढवळाढवळ वाढली आहे, असेच सुरू राहिल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशारा खासदार अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) यांनी दिला आहे.
याबाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, 'आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आम्ही सुरुवातीपासूनच पक्षाचे काम करत पक्ष वाढविला आहे. मात्र, आता रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) येऊन पक्ष संघटना उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत. तसे झाल्यास आम्हीही त्यांच्या मतदारसंघात जाऊन अडचणी निर्माण करू शकतो. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात भाजप मजबूत आहे. मात्र, रमेश जारकीहोळी हे वेगवेगळ्या मतदारसंघात विनाकारण ढवळाढवळ करत आहेत. असेच सुरू राहिल्यास त्यांना योग्य धडा शिकवावा लागेल.'
रमेश जारकीहोळी यांनी सहा मतदारसंघात विशेष लक्ष देऊन तेथे आपल्या समर्थक उमेदवारांना ताकद देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये निपाणी मतदारसंघात त्यांनी भाजपला शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अथणी, कागवाड, निपाणी, बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, कुडची या मतदारसंघात त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी बेळगाव ग्रामीण वगळता उर्वरित ठिकाणी भाजपचाच आमदार आहे. पण, तरीही तीन ठिकाणी उमेदवार बदलण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
बेळगाव दक्षिणमध्ये आमदार अभय पाटील यांच्याऐवजी किरण जाधव यांना उमेदवारी देण्यात यावी. निपाणी येथे शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांच्याऐवजी उत्तम पाटील (Uttam Patil) यांना तर कुडची येथे पी. राजीव यांच्याऐवजी शाम घाटगे यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये नागेश मनोळकर, अथणी येथे महेश कुमठळ्ळी आणि कागवाड येथे श्रीमंत पाटील यांना उमेदवारीसाठी त्यांचा आग्रह आहे. हुक्केरी मतदारसंघाबाबत मात्र निखिल कत्ती यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असे जाहीर भाष्य त्यांनी केले आहे.
जारकीहोळींना हवे 16 मतदारसंघांचे पालकत्व
रमेश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील 16 मतदारसंघांचे पालकत्व आपल्याकडे द्यावे, अशी मागणी भाजप हायकमांडकडे केली आहे. गोकाक, आरभावीमध्ये आपला विजय निश्चित असून 16 पैकी 15 मतदारसंघात भाजपला विजयी करून दाखवू, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र हायकमांडने अजूनही त्यांना त्याबाबत काहीच सूचना केलेली नाही.