काळ्या कपड्यांचा धसका

Karnataka Police Restrictions on Black Day
Karnataka Police Restrictions on Black Day

बेळगाव : कर्नाटक सरकारने काळ्या कपड्यांचा धसका घेतला आहे. काळे कपडे परिधान करून १ नोव्हेंबर रोजी सायकल फेरी काढण्यावर बेळगाव पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. शिवाय कोणत्याही प्रकारचे फलक प्रदर्शित करण्यावरही बंदी आणली आहे.


बेळगावसह सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला जातो. यावेळी मराठी भाषिक काळे कपडे परिधान करून, दंडाला काळ्या फिती बांधून मूक सायकल फेरी काढतात, पण यावेळी काळे कपडे परिधान न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मार्केट पोलिस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी युवा कार्यकर्त्यांना पाठविलेल्या नोटिशीत हा उल्लेख केला आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच असा लेखी आदेश बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. युवा समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १९९७ च्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे.

जेम्स मार्टीन विरुद्ध केरळ सरकार यांच्यातील दाव्यात हा आदेश दिला होता. त्यानुसार कोणत्याही संघटनेकडून बंद, निदर्शने, धरणे किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचे नोटिसीत नमूद आहे. बंद, निदर्शने, धरणे किंवा मिरवणुकीवेळी कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही. झाल्यास संबंधित संघटनेला जबाबदार धरले जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी काळा दिन साजरा केल्यास किंवा त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संघटनेला जबाबदार धरले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.


पोलिसांनी सहा अटीही घातल्या आहेत. त्यानुसार पोलिस परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरता येणार नाही. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग किंवा जिल्हा मार्गावरून मिरवणूक काढता येणार नाही. तेथील वाहतुकीला अडथळा आणता येणार नाही. वर नमूद केल्यानुसार सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही. प्रदर्शने किंवा बंद काळात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. शहरातील कोणतेही दुकान बळजबरीने बंद करता येणार नाही. शिवाय काळे कपडे परिधान करून व हातात फलक घेऊन सायकल फेरी काढता येणार नाही.

परवानगीला टाळाटाळ
दरवर्षी काळ्यादिनाच्या फेरीला परवानगी देताना जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते. यंदाही तोच प्रकार सुरू आहे. काळ्यादिनाच्या फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी होतात. त्यावेळी काळे कपडे परिधान केले जातात. पण, त्याला यावेळी प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. काळ्यादिनी मराठी भाषकांकडून काळे फुगे सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा धसका घेतला होता. आता काळ्या कपड्यांचा धसका घेतला आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com