esakal | KDCC Election :...तर दुसऱ्या पॅनेलची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Election :...तर दुसऱ्या पॅनेलची शक्यता

KDCC Election :...तर दुसऱ्या पॅनेलची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला नाही, तर या निवडणुकीत विरोधी पॅनेल ताकदीने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विरोधी पॅनेलकडून विकास संस्था गटातील काही जागांसह इतर गटांतील सर्व म्हणजे नऊ जागा लढविण्याची तयारी सुरू आहे, तशी प्राथमिक रणनीतीही निश्‍चित करण्यात आली. दरम्यान, जागावाटपाचा निर्णय फिसकटल्यास आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजीमंत्री भरमू पाटील आदींच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनेल रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

सोसायटी गटात शिरोळमधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात ‘दत्त-शिरोळ’चे गणपतराव पाटील यांची उमेदवारीही निश्‍चित झाली असून, त्यांच्यासाठी श्री. शेट्टी यांचे विरोधक माजी आमदार उल्हास पाटील आदी एकवटले आहेत. राधानगरीतूनही ए. वाय. यांच्या विरोधात विश्‍वनाथ पाटील-गुडाळकर यांचे नाव जाहीर झाले आहे. भुदरगडमध्ये के. पी. पाटील यांना मदत न करण्याचा निर्णय आमदार प्रकाश आबिटकर गटाने घेतला आहे, तर चंदगड तालुक्यात आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात भरमू पाटील, शिवाजी पाटील एकत्र येत आहेत.

आबिटकर गटाकडून पतसंस्था व नागरी बँक गटाची तयारी सुरू आहे. आबिटकर यांचे बंधू अर्जुन हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. श्री. शेट्टी यांनीही एका जागेची मागणी केली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहेत, त्याच धर्तीवर बँकेतही पॅनेल होणार असले, तरी तालुक्यातालुक्यांत असलेली ही नाराजी दूर करणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान असेल. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद व ‘गोकुळ’च्या पराभवानंतर माजी आमदार महाडिक यांची सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यातअडचण आहे.

गगनबावड्यातील तिढा सुटणार

गगनबावडा तालुका विकास सोसायटीतून सध्या पी. जी. शिंदे संचालक आहेत. त्यांच्या विरोधात थेट पालकमंत्री सतेज पाटील यांनीच दंड थोपटले आहे. आघाडीतील असंतोष कमी करण्यासाठी श्री. शिंदे यांच्या पत्नीला महिला प्रतिनिधी गटातून उमेदवारी देऊन ही जागा बिनबिरोध करण्याची प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते.

राजकीय समीकरणही बदलणार

लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेसह ‘गोकुळ’च्या निवडणुकीपासून मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांचा बोलबाला सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद आमदार पी. एन. पाटील यांच्या मुलाला देऊन या दोघांनी त्यांचाही विरोध कमी केला; पण जिल्हा बँकेच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणेच बदलणार आहेत. त्याचे पडसाद लगेचच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळतील.

प्रा. पाटील नकोत, तर आसुर्लेकरही कशाला?

पतसंस्था गटातून गेल्या निवडणुकीत प्रा. जयंत पाटील यांचा अवघ्या चार मतांनी पराभव झाला. प्रा. पाटील हे ‘जनसुराज्य’चे आमदार कोरे यांचे नेतृत्त्व मानतात. त्यांच्या नावाला पालकमंत्री पाटील यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर प्रा. पाटील नको असतील तर आम्हालाही श्री. आसुर्लेकर नको, अशी भूमिका श्री. कोरे यांनी घेतल्याचे समजते.

loading image
go to top