
Kohlapur Crime: साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल कोरोचीत चोरीस
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे बांधकाम साहित्य व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी फोडले. कुलूप तोडून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने व रोख ५ लाख १० हजार रुपये असा एकूण १० लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याची नोंद शहापूर पोलिसांत झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोची येथील छत्रपती कॉलनीत सचिन रुपनुरे कुटुंबिय राहण्यास आहे. ते कुटुंबासह घराला कुलूप लावून शनिवारी (ता. २८) सायंकाळी रेंदाळ येथील नातेवाईकांकडे गेले होते. आज सकाळी घरी परतले असता घराचा कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी घरातील दोन वेगवेगळ्या खोल्यांतील २ तिजोऱ्या फोडल्या. त्यातील नेकलेस, चेन, अंगठ्या, गंठण, राणीहार, कर्णफुले असे सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने, चांदीचे दागिने आणि ५ लाख १० हजार रुपये असे एकूण १० लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे उघड झाले.
पोलिस उपनिरीक्षक दीपक माळी यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. घरफोडीचे गांभीर्य पाहता पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र तेही काही अंतरावर शहापूर मार्गावरील घोरपडे कारखान्याजवळ घुटमळले. या ठिकाणी चार ते पाच व्यापाऱ्यांची दुकाने असल्याने सीसीटिव्ही आहेत.