Kolhapuer सोयीच्या पॅसेंजरमध्ये सुविधांची वानवा Kolhapuer Neglect Railway Administration local passenger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railways

Kolhapuer News : सोयीच्या पॅसेंजरमध्ये सुविधांची वानवा

कोल्हापूर : प्रवाशांच्या सोयींच्या ठरणाऱ्या कोल्हापूर ते पुणे व सातारा मार्गावरील दोन पॅसेंजर (डेमो) रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे; मात्र रेल्वेच्या अंतर्गत स्वच्छतेपासून ते पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयी सोसाव्या लागत आहेत. पॅसेंजरचे प्रवासी म्हणजे स्थानिक प्रवासी.

त्यांचा प्रवास झाला, काम संपले अशा थाटात रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुविधा देण्यात कंजुषी केली आहे. याचा अनुभव प्रत्यक्ष सोमवारी (ता. ६) डेमो रेल्वे प्रवासातून अनुभवास आला.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजता कोल्हापुरातून पुण्यास पॅसेंजर सुटली. मुंबई लोकलच्या सारखीच दणकट व भक्कम बांधणीची नवी रेल्वे होती. गाडीत प्रवेश करताच स्वच्छतागृहात पाणी नसल्याने दुर्गंधी पसरलेली. आसनाखाली धूळ, कचरा पडलेला.

अडकलेल्या खिडक्यांमुळे गार वारा, थंडी सोसणे सुरू झाले. ताकारीपर्यंतच्या दोन तास प्रवासात रेल्वे कॅन्टिनचा एक चहावाला चहा विक्रीसाठी एक फेरी मारून गेला. गाडीत आबालवृद्ध, महिला प्रवासी होते. बहुतेक स्वच्छतागृहात पाणीच नव्हते. बेसिन थुंकून घाण झालेली. काही ठिकाणी आक्षेपार्ह बाटल्या पडलेल्या होत्या. गलिच्छ वातावरणातील प्रवास सकाळी पावणेदहाला साताऱ्यात थांबवला.

दुपारी दोन चाळीस वाजता पुणे-कोल्हापूर डेमो गाडीतून परतीचा प्रवास रखरखत्या उन्हात सुरू झाला. सकाळप्रमाणेच गैरसोयीचा अनुभव कायम होता. प्रवासी तहानेने व्याकुळले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबायची, तेथे पाण्याच्या टाकी-नळ होते; पण त्यांपैकी ८० टक्के नळ बंद होते. बहुतेक नळ नादुरुस्त. नव्याने बांधलेल्या टाकीला पाणीच सुरू नाही, तर ज्या प्लॅटफॉर्मवर नळाला पाणी होते तिथे अनेक फिरस्ते, रुग्ण त्या नळाला तोंड लावून पाणी पीत होते, तर मोरीतील अस्वच्छता बघून पाणी पिण्याची

इच्छा होणे मुश्किल होते. अशात वयोवृद्ध व्यक्ती डब्यातून उतरून नळावरचे पाणी पिण्यासाठी गेले तर तीन मिनिटे संपताच गाडी सुटत होती. त्यामुळे पाणी घेणेही अवघड झाले. अशा स्थितीत तहानलेल्या अवस्थेत तीन तास प्रवास करण्याची शिक्षा जणू प्रवाशांना भोगावी लागली.

साध्या गोष्टीतही रेल्वेची बेफिकिरी

प्रवाशांना पिण्याचे पाणी देणे, रेल्वे डबा स्वच्छ ठेवणे, स्वच्छतागृहात पुरेसे पाणी उपलब्ध करणे या साध्या गोष्टीतही रेल्वेची बेफिकिरी ठळक होती. या गैरसोयी सतत झाल्या, प्रचलित झाल्या तर रेल्वे प्रवासी खासगी गाडीने प्रवास करतील. तेव्हा प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी पॅसेंजर बंदचा दावा रेल्वे प्रशासन करू शकेल. हे दुष्ट चक्र थांबवण्यासाठी प्रशासनाला जागे करण्याची गरज आहे.