कोल्हापूर : अन्य १३ उमेदवार करतात तरी काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi and BJP

कोल्हापूर : अन्य १३ उमेदवार करतात तरी काय?

कोल्हापूर: उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अन्य पक्षांचे आणि अपक्ष १३ उमेदवार करतात तरी काय ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. रिंगणातील अन्य पक्ष व अपक्षांपैकी एक-दोन उमेदवारांचा सोशल मीडियावरील दिसणारा प्रचार वगळता इतरांकडून केवळ उमेदवारी अर्ज भरण्यापुरते आणि उमेदवारांच्या यादीत नाव येण्यापुरतेच अस्तित्व दिसत आहे. १३ उमेदवारांपैकी कोण किती मते घेणार, कोणाची अनामत शाबूत राहणार याची उत्सुकता असेल. निवडणुकीचा निकाल कमी मताधिक्क्याने लागला तर या उमेदवारांपैकी कोणाचा फटका पराभूत उमेदवारांना बसणार याचीही उत्सुकता असेल.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. १२ एप्रिलला मतदान होत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले; पण त्याला यश न आल्याने आघाडीकडून श्रीमती जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्याचवेळी अन्य १३ उमेदवारांनीही विविध पक्षांकडून व अपक्ष म्हणून अर्ज दाखल झाले आहेत. यात सौ. करुणा धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. निवडून आल्यानंतर शहरात बऱ्याच गोष्टी करण्याचे आश्‍वासन मुंडे यांनी अर्ज दाखल करताना दिले होते; पण तेव्हापासून त्या प्रचारापासून दूर आहेत. इतर सर्व उमेदवारांचे ‘एकला चलो रे’ असा प्रचार सुरू आहे.

लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत लक्षवेधी मते घेऊन राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या अस्लम सय्यद यांची माघार घेण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. तथापि त्यांना मानणारी मते आघाडीकडे वळवण्याचे आव्हान आघाडीच्या नेत्यांसमोर असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टाईनंतर माघार घेतलेल्या सय्यद यांनीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ही निवडणूक कोणत्याही स्थितीत लढवण्याची घोषणा करून शहरभर वातावरण केलेल्या आम आदमी पार्टीने ऐनवेळी माघार घेतली.

उमेदवार असे

यशवंत कृष्णा शेळके, विजय शामराव केसरकर, शाहित शहाजान शेख (सर्व नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्य पक्ष). सुभाष बैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत संभाजी भोसले, मनीषा मोहन कारंडे, अरविंद भिवा माने, मुश्‍ताक अजित मुल्ला, करुणा धनंजय मुंडे, राजेश ऊर्फ बळवंत सत्त्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे (सर्व अपक्ष)

Web Title: Kolhapur About Candidates Mahavikas Aghadi Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top