कोल्हापुरात माजी भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं, पाच जण ताब्यात

कोल्हापुरात माजी भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं, पाच जण ताब्यात

भाजपच्या विजय जाधवांसह पाच जण ताब्यात

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी काही तास बाकी असतानाच पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भरारी पथकाने शहरात तीन ठिकाणी कारवाई केली. मंगळवार पेठ, वारे वसाहत आणि सुतारमळा येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी भाजपचे विजय जाधव, अशोक देसाई यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. तीन कारवाईत मिळून सुमारे ८५ हजार रुपये रोख आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल झाले.

पोलिसांनी सांगितले, की भरारी पथकाचे प्रमुख फिर्यादी अनिल कृष्णा सलगर हे दुपारी पावणेपाच वाजता मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिराजवळ भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मोहिते यांच्या कार्यालयात तपासणीसाठी पोचले. तेथे त्यांना मतदारांची नावे असलेली वही, पांढऱ्या रंगाचे पाकीट आणि रोख ४५ हजार ५०० रुपये मिळून आल्यामुळे ते जप्त केले. येथे संशयित दिसलेले अशोक शंकरराव देसाई (रा. रिंगरोड फुलेवाडी), विजय महादेव जाधव (राजारामपुरी चौथी गल्ली) आणि संतोष सदाशिव माळी (मंगळवार पेठ) यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली. संशयित हे पोटनिवडणुकीतील मतदारांना पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरून सापडल्याने त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

काल रात्री साडेअकरा वाजता वारे वसाहत येथे एका मोपेड चालक मतदारांना वाटण्यासाठी डिकीतून पांढऱ्या रंगाचे पाकीट घेऊन आला होता. त्यामध्ये पाचशे रुपये आणि पांढरे पाकीट आणि त्यावर कोपऱ्यात श्रीकांत कसबे असे नाव लिहिल्याचे दिसून आले. तसेच एकूण तीन महिलांची नावे आणि पाकिटे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी मोपेड ताब्यात घेऊन मोपेड चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचे नाव, पत्ता समजू शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले, की भाजप पक्षाचे कार्यकर्ते संशयित प्रवीण जयवंत कणसे (रा. भोसलेवाडी कोल्हापूर) आणि जोतीराम तुकाराम जाधव (मूळ रा. जयसिंगपूर, सध्या घोरपडे गल्ली, कोल्हापूर) हे सुतारवाडा येथे साडेपाच वाजता भाजप पक्षाचे उमेदवारांना मतदारांनी मतदान करावे, यासाठी रोख रक्कम वाटताना सुमारे ३९ हजार ५३० रुपये रोख रक्कमेसह मिळाले. याबाबतची फिर्याद भरारी पथकाचे प्रमुख योगेश देसाई यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. रोख रकमेसह दोन मोबाइल हॅण्डसेट ताब्यात घेतले आहेत. येथे इंग्रजी मध्ये ‘बीजेपी’ व कमळ चिन्ह असलेले भगवा व हिरवा रंग असलेले स्कार्फ, दोन हजार, पाचशेच्या नोटा, मतदारांची नावांची यादी व मोबाइल क्रमांक असलेले दोन झेरॉक्सचे कागद मिळाले आहेत. वाहन ही पोलिसांनी जप्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com