कोल्हापूर : बर्न पेपर, कोन वाढवतोय नशेची झिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : बर्न पेपर, कोन वाढवतोय नशेची झिंग

कोल्हापूर : बर्न पेपर, कोन वाढवतोय नशेची झिंग

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः पूर्वी नशा करण्यासाठी चिलीम असायची. आता याच चिलमीची जागा थेट पेपर आणि कोनने घेतली आहे. होलसेलमध्ये तीन-साडेतीन रुपयांना मिळणारा कोन चक्क दहा-पंधरा रुपयांना विकला जातो. एक विक्रेता रोज किमान ४०-५० पेपर कोनची विक्री करतो. एका कोनमध्ये तास-दीड तासाची नशा होते. या कोन आणि पेपरची खुलेआम आणि पाच ब्रॅण्डमध्ये सध्या विक्री होत आहे. पेपर आणि कोनमुळे नशा अधिक सोपी झाली आहे. याच कोन आणि पेपरची खरेदी करून पुढे उजाड माळावर, अडगळीच्या ठिकाणी बसून नशा केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव जोडले गेले आणि त्यातून घरोघरी ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आला; पण अशाच ड्रग्जचा कारखाना चंदगड तालुक्यामध्ये उद्‍ध्वस्त करण्यात आला तेव्हा मात्र कोल्हापूरकरांसाठी याचे गांभीर्य अधिक वाढले. आज शहरात खुलेआम नशा करण्याच्या साहित्याची विक्री होत आहे. आम्हाला विक्रीला परवानगी आहे; मात्र येथे गांजा कोण ओढत नाही, असे विक्रेते सांगतात; मात्र याच बर्न पेपर आणि कोनची विक्री रोज मो‍ठ्या प्रमाणात होत आहे. आम्ही काही विक्रेत्यांना भेटून त्यांच्याकडे अधिक माहिती घेतली तेव्हा त्यांनी विक्री होते; पण तेथे थांबून पिण्यास मनाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सहलीसाठी निघाले तर एकाच वेळी कोनची होलसेल खरेदी करतात. तरुणाई ॲडिक्ट (सवयीची) होत आहे. हीच नशा करण्यासाठी तरुण तासन् तास एकाच ठिकाणी बसून राहतात. मित्रांसोबत मैफल बसविली जाते. नेमके याकडेच पालकांनी गांभीर्याने पाहणे आज महत्त्वाचे आहे.

मुलांकडे पालकांचे लक्ष आवश्‍यक

मुलांकडे आपण विश्‍वासाने जरूर पाहतो; पण ती कळत-नकळत संगतीने असो किंवा अन्य कारणाने नशेच्या आहारी जात आहेत का, याकडेही पालकांचे लक्ष आवश्‍यक आहे. रोजच्या व्यापात मुलांकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही, असे म्हणणे म्हणजे वेळ निघून गेल्यावर उपचार करण्यातील प्रकार होऊ शकतो. त्यामुळे तरुणाईबरोबरच पालकांनीही जागरूक राहण्याची ही वेळ आहे.

झुरका ओढण्यासाठी मित्रांची बैठक

मित्रांची बैठक बसली की, केवळ उजव्याच बाजूला बसलेल्या मित्राला हा कोन झुरका ओढण्यासाठी दिला जातो. केवळ शंभर रुपयांत पाच ते दहा तरुणांची झिंग भागविली जाते. त्यानंतर सुमारे दीड-दोन तास डोक्याला झिंग चढते. म्हणूनच काही मित्र तासन् तास एकाच ठिकाणी विशेष करून मोकळ्या माळावर थांबतात. इतर नशेपेक्षा ही नशा स्वस्त मानली जाते. म्हणूनच तिला मागणी असल्याचेही सांगण्यात येते.

असा असतो ‘कोन’

पूर्वी केवळ टेन्सिल पेपरसारख्या बर्न पेपरची विक्री होत होती. रुपयाला मिळणारा हा पेपर घेऊन त्याचा कोन (सिगारेटसारखा आकार) तयार केला जात होता; मात्र यासाठी कौशल्य आणि वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे ही पद्धत सुरू असतानाच त्याचा ‘कोन’ तयार करून नशा आणखी सोपी करण्यात आली. याच कोनमध्ये कधी ८०० रुपये किलो मिळणारा तंबाखू, तर कधी गांजा घालून तो ओढला जात असल्याचे सांगण्यात येते.

तरुणाईकडे पोलिसांनी द्यावे लक्ष

तलाव, उजाड माळ, पाण्याची टाकी, अडगळीवरील रस्ते (स्मशानभूमी), मैदाने, वर्दळ कमी असलेले चौक अशा ठिकाणी तरुणाई तासन् तास उभी असल्यास त्याचे कारण काय, याकडेही पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची काळजी घेऊन नशेचा शोध घेतला तर नक्कीच अनपेक्षित बाबी समोर येतील.

loading image
go to top