कोल्हापूर : जलदिंडीतून प्रदूषणमुक्‍तीची हाक

जिल्हाधिकारी रेखावार, शाहू कृतज्ञता जलदिंडीला प्रारंभ
 जलदिंडीतून प्रदूषणमुक्‍तीची हाक
जलदिंडीतून प्रदूषणमुक्‍तीची हाकsakal

तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ’च्या पुढाकाराने राबविल्या जाणाऱ्या ‘पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत गुरुवार (ता. २१)पासून राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीला उत्साहात प्रारंभ झाला. गावोगावी जलदिंडीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. पिरळ (ता. राधानगरी) येथील उगमापासून सुरू झालेली जलदिंडी सायंकाळी शिंगणापूर (ता. करवीर) येथील घाटावर पोचली. शुक्रवारी (ता. २२) सकाळी शहरातील पंचगंगा घाटावर जलदिंडीचे स्वागत होईल.

कसबा तारळे : लेकराच्या भविष्याची काळजी आई-वडील ज्या भावनेने घेतात, त्याच भावनेने नद्या वाचविण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पाणी प्रदूषित करण्यापेक्षा प्रदूषित पाणी प्रक्रिया करून स्वच्छ करणे, यावर पैसा खर्च होतो. प्रदूषित पाण्यामुळे होणारे आजार, त्याचे दुष्परिणाम हे रोखण्यासाठी आणि उपायांसाठी होणाऱ्या औषधोपचारांवर खर्च होतो. नद्यांचे पाणी प्रदूषण थांबविणे हा जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरू शकतो, असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केले.

चला पंचगंगा वाचवूया’ मोहिमेंतर्गत पिरळ (ता. राधानगरी) येथे भोगावती नदीकाठावर ‘राजर्षी छत्रपती शाहू कृतज्ञता जलदिंडी’चा प्रारंभ आज झाला. या वेळी ते बोलत होते. ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.आसावरी जाधव, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयवंत साळुंखे,उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने,सचिन हरभट आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. रेखावार म्हणाले, की नदीचे मोठे उपकार सर्वांवर असतात. पूर्वज, सध्याची पिढी आणि भावी पिढी यांचे एक वेगळेच नाते नद्यांशी जोडलेले असते. या नद्या प्रदूषणमुक्त कशा राहतील, यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत. पाणी प्रदूषण थांबविणे अवघड नसल्याचे सांगताना त्यांनी मराठवाड्यातील अनेक गावे ही सांडपाणीमुक्त कशी आहेत, हे उदाहरणांसह सांगितले. आपल्या जिल्ह्यातही १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या सुमारे ३९ गावांनीही पाणी प्रदूषणमुक्तीचा उपक्रम राबविल्याचेही त्यांनी सांगितले. शोषखड्डे हा पाणी प्रदूषणमुक्तीचा जालीम उपाय असल्याचे सांगताना जर सांडपाणी शोषखड्ड्यांत मुरले तर डास, माशा दिसणार नाहीत आणि आरोग्य तर चांगले राहीलच. जेथे शोषखड्डे हा मार्ग अपुरा पडेल, तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून ते स्वच्छ पाणी शेतीसाठी वापरावे.

ते म्हणाले, की सांडपाणी जसे आहे, तसे शेतीला वापरणे हे चुकीचे आहे. त्याचा परिणाम शेती व पिकांवर होतो. नद्या, विहिरीत होणारे गौरी-गणपतींचे विसर्जन आणि रक्षाविसर्जन जर थांबवू शकतो तर सांडपाणी आणि कचराही नदीत मिसळण्यापासून थांबविणे अशक्‍य नाही. याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी.

नद्यांकडेही दुर्लक्ष होऊ नये,

हा जलदिंडीचा संदेश श्रीराम पवार

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविकात ‘सकाळ’च्या मोहिमेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की कोणताही उपक्रम हा लोकसहभागातून अधिक प्रभावीपणे राबविता येऊ शकतो व त्याचे यशही मोठे असते. हे ‘सकाळ’ने यापूर्वी अनेक उपक्रमांतून दाखवून दिले आहे. नद्यांचे गटार करण्यासाठी दुसरे कोणालाही जबाबदार न धरता ती जबाबदारी आपलीच आहे, असे समजून सर्वांनीच नदी प्रदूषण थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

नदी प्रदूषणाविषयीची ही जागृती कोल्हापूर जिल्ह्यात मुळातच आहे. ती कृतीत आणण्यासाठी ‘सकाळ’ने ११ वर्षांपूर्वी आणि आताही पुढाकार घेतला.

ज्या गावात नळाने पाणी येते, तेव्हा गावकऱ्यांचा पाणवठे, नदीचा संपर्क तुटतो. घरात पाणी शुद्ध मिळते; परंतु नद्यांशी संपर्क तुटल्याने नद्या दुर्लक्षित होतात. नद्यांकडेही दुर्लक्ष होऊ नये, हा या जलदिंडीचा संदेश आहे.

भौतिकदृष्ट्या, नैसर्गिकरित्या पिरळकरांची श्रीमंती चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, की ‘सकाळ''च्या मोहिमेची नव्याने सुरुवात होत आहे. पिरळ हे नदी प्रदूषणात सहभागी नसलेले गाव असले, तरी भविष्यातही सांडपाण्याचा एक थेंबही नदीत न मिसळण्यासाठी पिरळकरांनी जिल्ह्याला संदेश देण्याची ही जलदिंडी म्हणजे संधी आहे. भौतिकदृष्ट्या व नैसर्गिकरित्या ही पिरळकरांची श्रीमंती टिकविण्यासाठी आणि ही श्रीमंती जिल्ह्याला मिळण्यासाठी पाणीप्रदूषण टाळणे ही काळाची गरज आहे. गरजेपुरते पाणी भरल्यावर एक थेंबही पाणी वाहून जाता कामा नये, त्यासाठी गावागावांनी नळाला मीटर लावून घेण्याची गरज आहे. पंधराव्या वित्त आयोगातून शासन पाणी आणि स्वच्छता यावरच जास्त खर्च करते. पंचगंगेबरोबरच पंचगंगेकाठची मूळची संस्कृती वाचविण्यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे.

कार्यक्रमाला ‘सकाळ''चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, ‘सकाळ''चे वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, विस्तार अधिकारी श्री. जमदाडे, श्री. साबळे, श्री. जंगम आदींचे स्वागत सरपंच मारुती चौगले, उपसरपंच संतोष लोहार, संदीप पाटील, विशाल पाटील, संतोष पाटील, ग्रामसेवक युवराज पाटील, डी. जी. चौगले, आर. डी. चौगले, समीर आसणेकर, शिवाजी रेडेकर, अशोक पाटील, श्रीपती इंजर, मीनाक्षी आसणेकर, पूजा चौगले आदींनी केले.

जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग भांदिगरे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, जेनेसिस महाविद्यालयाचे प्राचार्य शोभराज माळवी, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, राकेश बोंबाडे, उपअभियंता प्रवीण पारकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भजनी मंडळाच्या सहकार्याने गावातून प्रभातफेरी काढली. समारंभादरम्यान उपस्थित सर्वांनी जलशपथ घेतली.

जलदिंडी प्रारंभ समारंभ यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकारी, बातमीदार मोहन नेवडे, राजू पाटील, सुरेश साबळे, एस. के. पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. प्रकाश कानकेकर यांनी सूत्रसंचालन केले. सागर पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com