नाचणा उत्पादनात चंदगड राज्यात अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur crop

Kolhapur; नाचणा उत्पादनात चंदगड राज्यात अव्वल

चंदगड : २०२१-२२ मधील स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात खरीप हंगामातील नाचणा उत्पादनात चंदगड तालुका राज्यात अव्वल ठरला. पहिले तीन क्रमांक तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावले. राज्याच्या अन्य भागांत एकरी सरासरी १५ क्विंटल उत्पादन होताना चंदगड तालुक्यात मात्र ते २१ क्विंटलहून अधिक आहे. वैशिष्ट्य म्हणजे शासनाने विकसित केलेल्या बियाण्यावर स्थानिक प्रजातीच्या बियाण्याने मात केल्याचेही स्पष्ट झाले.

शासनातर्फे दरवर्षी विविध पीक स्पर्धा घेतली जाते; परंतु या विभागातील शेतकरी सहसा भाग घेत नाहीत. कृषी विभागामार्फत एका कार्यक्रमात नाचणा पिकासंदर्भात माहिती देत असताना संकरित जातीचे बियाणे वापरल्यास अधिक उत्पादन मिळेल, असा दावा केला. त्याला प्रगतशील शेतकरी डॉ. सदानंद गावडे (नांदवडे) यांनी आव्हान दिले.

त्यांच्या मते ज्या त्या भागातील स्थानिक प्रजातीच अधिक उत्पादन देतात. त्या रोगांना बळी पडत नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रजातीच महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. याच मुद्द्यावरून त्यांनी खरीप हंगामातील नाचणा पीक स्पर्धेत सहभाग घेतला. परिसरातील इतर काही शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित केले. गिड्डी गौळण, गिडाप्पा, माकडीचे टकले या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक जातीची लागवड करण्यात आली.

यामध्ये निंगोजी बारकू कुंदेकर (शेवाळे, ता. चंदगड) यांनी हेक्टरी ७२ क्विंटल, सदानंद नरसू गावडे यांनी ५२ क्विंटल, तर सुलभा सटूप्पा गिलबिले यांनी ५१ क्विंटल उत्पादन घेऊन अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले. संकरित बियाण्यापेक्षा त्यांचा सरासरी उतारा जास्त असल्याचे सिद्ध करून दाखवले. नाचण्याचे औषधी गुणधर्म, पीठ व इतर उपपदार्थांना मागणी विचारात घेता प्रक्रिया उद्योगालाही मोठा वाव आहे.

चंदगड, आजरा तालुक्यांतील वातावरण नाचण्याच्या पारंपरिक बियाण्याला चांगले आहे. व्यावसायिक पद्धतीने या पिकाचे उत्पादन घेतल्यास उसापेक्षाही ते फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करायला हवे.

- डॉ. सदानंद गावडे, नाचणा उत्पादक शेतकरी, नांदवडे