पाण्यापायी बोटं झाली वाकडी अन्‌ सांधेदुखीनं ग्रासलं!

कोल्हापुरात स्वच्छ व मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नियोजनशून्य कारभारामुळे अनेक नागरिकांवर वणवण करण्याची वेळ आली आहे.
पाण्यापायी बोटं झाली वाकडी अन्‌ सांधेदुखीनं ग्रासलं!

कोल्हापुर : कोल्हापुरात स्वच्छ व मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नियोजनशून्य कारभारामुळे अनेक नागरिकांवर वणवण करण्याची वेळ आली आहे. राजकीय नेते सोयीचे राजकारण करत आहेत आणि नागरिकांना मात्र पाण्याच्या थेंबासाठी धावाधाव करण्याची वेळ येत आहे. पाणी म्हणजे जीवन आहे, असे म्हटले जाते; परंतु याचं पाण्याच्या प्रश्‍नामुळे महिलांना संधीवातांपासून अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. घर बांधून चूक केली का, असे प्रश्‍न येत आहेत. मुलांच्या शाळा, कॉलेजला जाण्याचे बंद करण्याची वेळ त्यांच्यावर या पाण्यामुळे येत आहे. या सगळ्या प्रश्‍नांचा वेध घेणारी मालिका आजपासून...

‘‘पंधरा वर्षांपूर्वी पाचगावात जागा घेतली, घर बांधलं. त्यावेळी तुपाच्या धारेसारखे पाणी यायचं. पुढे वस्ती वाढली. नळ वाढलं आणि तुपाची धार जवळपास बंद झाली. रोज येणारं पाणी आठ दिवसांतून एकदा येऊ लागलं. पट्टी व्हाल्व्हच्या नळालगतच खाली थोडा खड्डा खणून त्याच्या धारेखाली एखादे भांडं ठेवू लागले आणि त्या भांड्यात टीपटीप गळणार पाणी सारखं एकाच जागी बसायचं, तिथेच उठायचं, वाकायचं, भरली घागर उचलायची आणि आत घरात नेऊन ओतायची. पंधरा वर्षे हे भोग सुरू आहेत.

पण पाण्याचा दाब काही वाढला नाही. उलट दिवसा येणारं पाणी रात्री अवेळी येऊ लागलं. त्यामुळं प्रकृतीवर विपरीत परिणाम झालाय. बोट वाकडी झालीत; पाठदुखी सुरू झालीय. सांधेदुखीनं ग्रासलंय. भरली घागरही उचलणं मुश्‍कील होऊन बसलंय. साधं पीठ मळायला जमेना, तरीही पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. येथून पुढे कधी सुटेल न सुटेल हे सांगता येत नाही. आता मुलांना सांगून दुसऱ्या भागात घर घ्यायचं आणि येथून तेवढं निघायचं, अस पक्क केलंय.’’

पाचगावातील साईनाथ पार्कमधील सुमन कांबळे आपली पाण्याची व्यस्था सांगत होत्या. कधी सद्‌गदीत होऊन, कधी संतापून तर कधी नाराजीतून त्या बोलत होत्या. पाचगाव परिसरात गेली पंधरा वर्षे सरकारी पाणी असूनही वेळेत मिळत नाही. पूर्ण दाबाने मिळत नाही. जेवढे मिळतय तेवढे भरायचे, साठवायचे, अशा कामात पूर्ण रात्र सरते. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड, पित्ताच्या तक्रारी सुरू होतात. घरातील महिलेचे आरोग्य बिघडले की अख्ख्या घराचंही आरोग्य बिघडते. पाचगावातील तमाम घरातील दृश्‍यांचा हा प्रातिनिधिक त्रास सुमन यांनी बोलण्यातून व्यक्त केला.

त्यांच्यासारखीच पाणी भरण्यासाठी मनीषा रेडीज आणि अनुजा भोसले यांच्याही झाडाझडती वाट्याला आली आहे. पाणी रात्री येते. कधी येईल, हे सांगता येत नाही. भरायला कंटाळा केला की पुढे आठवडाभर मिळणार नाही. यामुळे नाईलाजाने रात्री जागून पाणी भरावेच लागते. अशात एखादा पाहुणा घरी आल्यास जास्तीचे पाणी भरण्यासोबत त्यांनाही हेळसांड सहन करावी लागते. त्यामुळे आता पाहुणेही घरी येईनासे झाले आहेत. पाचगावची पाणी समस्या उभ्या जन्मात सुटायची की नाही, हे कोडे उलगडत नसल्याचेही त्या सांगतात.

एकतर आठ दिवसांतून एकदा पाणी येते. ठराविक दिवशी पाणी येणार म्हटंल, तर नेमक्‍या त्याच दिवशी पाणी येईल की नाही, हे सांगता येत नाही. पाण्याची वेळ रात्रीची असल्याने पाणी न आल्यास रात्री कोणाला फोन लावला तरी उचलला जात नाही. पाण्याची बारीक धार असते. ते पाणी बुट्टीत साठवून ग्लासने किंवा तांब्याने घागरीत ओतावे लागते. सारखे बसून, उठून, वाकून मला स्पाँडेलिसिसचा त्रास सुरू झाला आहे. कंबरेतून वाकताही येईना झालंय. त्यामुळे घरातील दैनंदिन कामे करतानाही त्रास सहन करावा लागतोय.

- मनीषा रेडीज, साईनाथ पार्क

तिसरी पिढीपुढेही समस्या तिच!

वीस वर्षांपूर्वी घराघरांत नळ आले. अर्ध्या भागात महापालिकेचे पाणी; अर्ध्या भागात जलप्राधिकरणाचे पाणी. त्याला निश्‍चित वेळ नाही. निश्‍चित दाब नाही. अशा परिस्थितीत पाणी भरता भरता तिसरी पिढी मोठी होत आहे. यातून पाणीपुरवठ्याची आजची दुर्दैवी समस्या भविष्यात कधी सुटेल, याचे निश्‍चित उत्तर नसल्याने टाचा घासण्याची वेळ आल्याचे महिलांनी सांगितले.

पाटीत पडणारे पाणी वाकून बादलीत भरावे लागते. घरात लहान मुले, सदस्य जास्त असल्यामुळे खर्चालाही मोठ्या प्रमाणात पाणी लागते. बादलीतून पाणी भरताना शरीरावर ताण येतो. उजव्या हाताने बादलीतून पाणी भरल्यामुळे खांद्यातून हात दोनवेळा निसटलाय. या हाताने मोठी मोठी कामे करता येत नाहीत. पाण्यामुळे मी जन्मभराची अधूच झाली आहे.

- अनुजा भोसले, नवजीवन कॉलनी

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com