
कोल्हापूर : ४५ डेसिबलवर आवाजाने हृदयविकाराचा धोका
कोल्हापूर : कोणत्याही ध्वनियंत्रणेचा ४५ डेसिबलवर निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. अशा ध्वनिलहरी कानावर पडल्या तर हृदयविकाराची लक्षणे तीव्र होऊन संबंधिताच्या जीवाला धोका होतो. अशा यंत्रणेचा ध्वनी मर्यादित ठेवणे हाच हृदयविकार टाळण्यासाठीचा पर्याय आहे, असे मत तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
सिस्टीम यंत्रणेचा मर्यादित आवाज ठेवून वापरता येतील; मात्र अनेकदा तांत्रिक क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यातून एकाच परिसरात असे आवाज घुमत राहतात. या आवाजाचा परिसरातील घरे, तसेच रुग्णालयांतील रुग्णांना सहन करावा लागतो. यात रुग्ण, लहान बाळ, गरोदर माता व ज्येष्ठ, व्याधीग्रस्त अशा रुग्णांच्या कानावर ध्वनिलहरी जास्त वेळ आदळत राहिल्याने त्यांना त्रास होतो.
हृदयात मर्यादित नैसर्गिक दाब सोसण्याची क्षमता असते; मात्र मोठ्या ध्वनी यंत्रणांचे ६० डेसिबलवर लहरी जास्त वेळ ऐकण्यात आल्यास हृदयाचा दाब वाढतो. नाडीचे ठोके वाढतात. रुग्ण अस्वस्थ होतो. त्यापुढे रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशी लक्षणे दिसतात.
मोठ्या आवाजापासून दूर राहणे चांगले
डॉ. बाफना म्हणाले, ‘‘लहान बाळांची हृदयाची क्षमता मर्यादित असते. वयोवृद्ध व्यक्ती अथवा व्याधीग्रस्त व्यक्तींच्या हृदय क्षमता कमकुवत झालेली असते, अशा व्यक्तींसाठी ध्वनी यंत्रणांचा मोठा आवाज अधिक धोकादायक ठरतो. काही वेळा तो त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतो. अशा आवाजापासून लहान बाळ व वयोवृद्ध, व्याधीग्रस्त व्यक्ती आणि दूर राहणे महत्त्वाचे आहे.’’