Kolhapur : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असणारी सर्व कामे तत्काळ पूर्ण करा ; पालकमंत्री केसरकर Kolhapur District Annual Plan immediately Minister Kesarkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar

Kolhapur : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असणारी सर्व कामे तत्काळ पूर्ण करा ; पालकमंत्री केसरकर

कोल्हापूर : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असणारी सर्व कामे तत्काळ पूर्ण करून घेतली पाहिजेत. मिळालेला निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा. तसेच इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवावी,’ अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केल्या. पालकमंत्री केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, ‘२०२२-२३ मध्ये सुरू असलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधीतून होणारी कामे गतीने पूर्ण करताना कामांचा दर्जा चांगला ठेवला पाहिजे. जिल्ह्यात इन्फ्लुएन्झा आजाराची परिस्थिती आटोक्यात आहे. तरीही यासाठी लागणारी औषधे व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवावी.

इन्फ्लुएन्झा संसर्ग एच -३ एन- २ आजाराच्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केल्यास तो लवकर बरा होतो. इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा. लसीकरण पूर्ण करून घ्या. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या करा, पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा सुविधा तयार ठेवा. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याला प्राधान्य द्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याबाबत व्यापक जनजागृती करा.’

ते पुढे म्हणाले, ‘जिल्हा वार्षिक योजना सन २०२२ -२३ साठी ४२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आतापर्यंत ३२०.२२ कोटी रुपये निधी शासनाकडून मिळाला आहे. आजअखेर २४२ कोटी ८९ लाख रुपयांच्या प्रशासकीय मंजुरी झाल्या आहे. आतापर्यंत १८७ कोटी ८ लाख रुपये निधी वितरित केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत शासनाच्या सूचनेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे २५ कोटी ७० लाख रुपये निधी आहे.

लम्पी रोग नियंत्रणासाठी ३ कोटी रुपये, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे यंत्रसामुग्री व साधनसामग्री खरेदीसाठी ८ कोटी २८ लाख रुपये निधी दिला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी २ कोटी व नगरपालिका, महानगरपालिकेत नगरोत्थान योजनेंतर्गत ११ कोटी इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे दिला आहे.’

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे व सद्यस्थितीची माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिका कामांची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, तर जिल्हा परिषदेच्या कामांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यावेळी राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित होते.

ऐतिहासिक ८१ वास्तूंच्या संवर्धनासाठी ८१ उद्योजक

‘कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत ८१ हेरिटेज वास्तू आहेत. या वास्तूंचे संरक्षण, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी ८१ उद्योजक तयार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यामध्ये या सर्व वास्तूंची जपणूक होण्यास निश्‍चितपणे मदत होणार आहे. यासाठी शासनाने या उद्योजकांना परवानगी दिली पाहिजे, अशी भूमिका महाडिक यांनी घेतली. याला पालकमंत्री श्री. केसरकर यांनी तत्त्वतः मान्यता दिली.