esakal | लसीकरणात कोल्हापुर जिल्हा राज्यात आघाडीवर! कोरोनाचा कहरच?
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19-Updates

लसीकरणात कोल्हापुर जिल्हा राज्यात आघाडीवर! कोरोनाचा कहरच?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने (Task Force) काही सूचना जिल्ह्याला केल्या होत्या; मात्र त्याच्या अंमलबजावणीत कमतरता राहिली. बाधितांवर घरी उपचार (होम आयसोलेशन) बंद करा, गर्दीवर नियंत्रण आणा, महापालिका हद्दीत कंटेन्मेंट झोन करा, अशा सूचना होत्या; पण त्याची शंभर टक्के अंमलबजावणी नसल्यानेच कोरोनाचा कोल्हापुरात (Kolhapur Covid 19) कहर सुरूच आहे.

जूनच्या शेवटच्या आठड्यापासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. बाधित आणि मृत्युसंख्येचे प्रमाण अधिक आहे. मेमध्ये हीच स्थिती जिल्ह्यात होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने टास्क फोर्स जिल्ह्यात पाठवला होता. टास्क फोर्सच्या पथकाने १२ मे रोजी जिल्ह्यात पाहणी केली. पथकाने इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाबरोबरच काही खासगी रुग्णालये व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला भेट दिली. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूंची माहिती घेतली. पाहणीनंतर त्यांनी प्रशासनाला निरीक्षण अहवाल दिला होता. त्यात गृह अलगीकरण शंभर टक्के बंद करण्याची महत्त्वाची शिफारस होती; पण आजही सक्रिय रुग्णांपैकी निम्मे रुग्ण घरीच उपचार घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. चाचण्या वाढवण्याची शिफारसही होती. त्यानुसार चाचण्या वाढल्या तशी बाधितांची संख्याही वाढत आहे; पण बाधितांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयात दाखल केल्यास मृत्युसंख्या कमी येईल, असे सुचवले होते; पण सद्यस्थिती पाहता या सूचनेचे पालनच होत नसल्याचे दिसून येते.

शहरातील अत्यावश्‍यक सेवेसह इतर दुकानेही सुरू आहेत. दुकानांसह रस्त्यावरही खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालनच होत नसल्याचे यापूर्वीही दिसून आले. त्यात अजूनही फरक पडलेला नाही. कारवाई करून पोलिसच वैतागले आहेत. अशा परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे, हा प्रशासनासमोरचाही मोठा प्रश्‍न आहे. लोकही बेफिकीर असल्याचे दिसून येते. मास्क व्यवस्थित न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव आणि सॅनिटायझरचा अपवादानेच वापर, अशी कारणेही बाधितांच्या वाढीमागे आहेत.

विरोधाभास चिंताजनक

लसीकरणात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाणही राज्यात अव्वल आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असताना ! संख्या का घटत नाही? हा विरोधाभासही चिंताजनक आहे. एका मुलाखतीदरम्यान, टास्क फोर्सच्या एका सदस्यानेच याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

loading image