esakal | भारीच ! कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांची पंढरीत होणार मोफत सोय
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur Ashadhi Wari

भारीच ! कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांची पंढरीत होणार मोफत सोय

sakal_logo
By
सागर चौगले

माजगाव (कोल्हापूर) : तीर्थक्षेत्र पंढरीत बारा महिने देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य संख्येने वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आषाढीला तर लाखोंच्या संख्येने वारकरी गर्दी करतात. गर्दीमुळे वारकऱ्यांच्या निवासाची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन सातार्डे (Satarde)(ता. पन्हाळा) येथील वारकरी सांप्रदायातील शंकर आनंदा भोसले यांनी स्वखर्चाने पंढरीत १२ खोल्यांचे भक्ती निवासाचे बांधकाम केले. तेथे वारकऱ्यांना राहाण्यासह सर्व सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. (kolhapur-district-warkari-satarde-shankar-bhosale-devotee-free-accommodation-in-pandharpur-akb84)

भोसले यांनी भक्तनिवासा बांधकामासाठी स्वखर्चाने पंढरीत रेल्वे स्टेशन समोर एमएसईबीच्या मागे देवकते मळा कॉलनी येथे चार गुंठे जमीन खरेदी केली. या ठिकाणी कूपनलिका खोदली. या कुपनलिकेला विठ्ठलाच्या कृपेने भरपूर पाणी लागले. तेथे बांधण्यात येत असलेले भक्तनिवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून एक महिन्यात ते वारकऱ्यांच्या सेवेत रूजू होईल. भक्तनिवासाच्या जागेसह इमारत बांधकामासाठी भोसले यांना सुमारे ५० लाख रूपयांच्या आसपास खर्च आला.

हेही वाचा: रडण्यातून घडली ती स्मृती आता प्रतिस्पर्धी संघाला रडवते!

शंकर भोसले हे विठ्ठल भक्त असून १६ वर्षांपासून नियमितपणे पंढरीची वारी करतात. त्यांनी पंढरीतील देवकते कॉलनीत जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडी भेट दिली आहेत. पंढरीत दरवर्षी ते अनाथ आश्रमात महाप्रसाद वाटप करतात. कोरोना महामारीत त्यांनी अनेक गरजू गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचे स्वतःचे गुरुमाऊली भजनी मंडळ आहे.

असे आहे भक्तनिवास

- दुमजली १२ खोल्यांचे दोन हजार स्क्वेअर फूटाचे बांधकाम

- भक्तनिवासच्या वरच्या मजल्यावर भजन, कीर्तनासाठी मोठा हॉल

- हॉलमध्ये एकाच वेळी सुमारे तीनशे वारकरी राहू शकतात

- वारकऱ्यांसाठी जेवणाची भांडी, गॅस आदींची मोफत सोय

विठुरायाच्या भेटीला तीर्थक्षेत्र पंढरीत आलेल्यांची राहण्याची मोठी गैरसोय होते. हे लक्षात घेत चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते या सेवाभावी वृत्तीने हे भक्तीनिवास श्री विठ्ठलाच्या कृपेने बांधले. बारा महिने हे भक्तिनिवास सर्व वारकऱ्यांच्या मोफत सेवेत असणार आहे. याचा भक्तांनी लाभ घ्यावा.

- शंकर भोसले, सातार्डे

loading image