
Kolhapur : गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू
पुनाळ : कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील माजी उपसरपंचांचा गव्याच्या हल्ल्यात आज मृत्यू झाला. माणिक बळवंत पाटील (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. गव्याचे शिंग त्यांच्या छातीत घुसले होते. दरम्यान, हल्ल्यानंतर गवा त्याच शेतात थांबून होता. पळापळीने दमछाक झालेला गवा सुमारे तीन तास शेतातच बसून होता. सायंकाळी वनविभागाने रेस्क्यू फोर्सच्या मदतीने गव्याला डोंगरात हुसकावून लावले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.
गेले दोन दिवस परिसरात गव्याचे दर्शन होत आहे. वाघजाई डोंगर परिसरात नेहमीच गवा पाहावयास मिळतो. दोन दिवस वाघजाई डोंगर, पडळ, माजगाव येथील डोंगर व शेतातून गवा पाहावयास मिळत आहे. हा गवा आज दुपारी कसबा ठाणे गावच्या हद्दीत आला होता. हरिजन वसाहतीच्या स्मशानभूमीजवळील शेतात गवा होता. दुपारी अडीचच्या सुमारास माणिक पाटील त्यांच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते.
वैरण कापत असताना बिथरलेला गवा अचानक समोर आला आणि त्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या छातीत गव्याने शिंग खुपसले. आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांना सीपीआर येथे हलवले; पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. दरम्यान, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सीपीआरमधील डॉक्टरांची, नातेवाईकांची भेट घेतली. वनविभागाला सूचना देऊन आर्थिक मदतीसाठी कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
तरुणांची अतिघाई..
दोन दिवस गवा परिसरात आहे. पूर्ण वाढ झालेल्या गव्याला पाहण्यासाठी व हुसकावून लावण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. गव्याच्या पाठीमागून पळत जाणे, काठी, दगडाने हुसकावून लावणे, त्याचे जवळ जाऊन व्हिडिओ करणे हे प्रकार सर्रास होते. यामुळे गवा बिथरतो व अंगावर चाल करुन येतो. हे प्रकार थांबविणे गरजेचे आहे.
कुटुंबाला शासनाने आधार द्यावा!
गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आज मृत्यू झालेल्या पाटील यांच्या पाठीमागे दोन मुली आहेत. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. शासनाने त्यांच्या एका मुलीला सेवेत घेऊन कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी कसबा ठाण्याचे सरपंच अनिष पाटील यांनी केली आहे.