
कोल्हापूर : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर करवीरवासीयांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. सवलती, कर्ज योजनांचा लाभ घेत खरेदीचा आनंद घेतला. यात दागिने खरेदीला सर्वाधिक प्रतिसाद लाभला. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला प्राधान्य दिले. यातून दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाली.
दोन वर्षांत कोरोना संकटामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते, यंदा मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाली. निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. आज अक्षय्य तृतीयेला प्रथेनुसार सोने खरेदी झाली. गुजरी सराफ बाजार तसेच राजारामपुरी, स्टेशन रोड, ताराबाई पार्कसह विविध ठिकाणच्या सराफी पेढ्यांवर दागिने खरेदीसाठी गर्दी होती. लग्नसराईचे औचित्य साधून अनेकांनी सोने खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स बाजारपेठेतही खरेदीला मोठी गर्दी होती. एलईडी टीव्हीच्या मागणी बरोबर वाढत्या उन्हामुळे फॅन खरेदी करण्यावर अनेकांचा भर होता. लक्ष्मीपुरीतील विद्युत उपकरणे बाजारपेठेत गर्दी होती. यातही कर्जाच्या हप्त्यांची सोय करणाऱ्या फायनान्स सुविधेचा लाभ घेत ग्राहकांनी खरेदी केली. दुचाकी बाजारपेठेत अनेकांनी दुचाकी खरेदीसाठी विविध दालनांत फेरफटका मारला. मात्र, काही मोजक्यांनीच दुचाकीची खरेदी नोंदवली.
दुप्पट दरात हापूस आंबा विक्री
अक्षय्य तृतीयेला पूजेसाठी लागणाऱ्या आंब्याला बाजारपेठेत मागणी होती. कोकणी हापूस आंब्याची मोठी आवक झाली. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट दरात आंबा विक्री झाली, गेल्या वर्षी डझन ते सव्वा डझन आंब्याचे बॉक्स ३०० रुपयात मिळत होते. आज त्याच बॉक्सचा दर ६०० रुपयांपर्यंत गेला. काही मोजक्या ठिकाणी मात्र हा बॉक्स चारशे ते पाचशे रुपयात विक्री झाली. तर दाक्षणित्य आंबा विक्रेत्यांनी आज घाऊक खरेदी केली नाही.
सोन्याचे मणिमंगळसूत्र, वाट्या, डोर्ले अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी झाली तर नवी कलाकौशल्य असलेल्या दागिन्यांना अधिक पसंती होती. यात ठुशी, नथ, साज, गंठण, ब्रेसलेट, रिंगा, चेन अशा दागिन्यांना पसंती होती. सोन्याचे भाव आज ५४ हजारांवरून ५३ हजारांवर आल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला.
- शीतल पोतदार, संचालक, सराफ संघ
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सिंगल डोअर, डबल डोअर फ्रीज खरेदीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. एसी खरेदीलाही अनेकांनी प्राधान्य दिले. वापरासाठी गरजेचे तसेच आधुनिक सुविधांचे संच खरेदीला ग्राहकांची पसंती होती.
मुग्धा नाके-कुलकर्णी, सारस इलेक्ट्रॉनिक्स
पेट्रोलचे दर वाढते आहेत. त्याबरोबर दुचाकी उत्पादनासाठी सुट्या भागांचा तुटवडा यासारख्या अडचणी आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची क्षमता, टिकाऊपणा विषयी काही शंका आहेत. या सर्वांचा परिणाम दुचाकी बाजारपेठेत जाणवला. त्यातून खरेदीत किंचित घट झाली.
- मुकेश भंडारे, संचालक, माय ड्रिम्स होंडा