
कोल्हापूर : लोकांच्या आरोग्यासाठी राबणारे हात
शहरातील स्वच्छतेची जबाबदारी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर असते. त्यांच्या कामाची सुरुवात रात्री दहापासून होते. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे हे कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र झटत असतात. त्यांच्यामुळेच घनकचरा निर्मूलन शक्य होते. उपनगरासह शहरातील मध्यवर्ती भागातील कचरा साफ करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन ते करतात. त्यांची स्वतःची अशी एक परिभाषा आहे. वेळेत आणि शिस्तबद्ध कामामुळे अवाढव्य काम शक्य होते. त्यांच्या आरोग्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, एवढीच अपेक्षा आहे.
ऋतू कोणताही, कामाला सुटी नाही
‘‘म्हाद्याला डंपरवर पाठव आणि अमृतला टिपवर जायला सांग. मीरा, संगीता आणि माया त्यांना बिंदू चौकात लोटायला लावलंय. भाऊसिंगजी रोडवर हाबक लावलंय. कचऱ्याचं ढीग करा आणि पटकन डंपरमध्ये भरा. मटण मार्केटमधलं चारट भरलं काय? चला लवकर लवकर काम करा... तुम्ही दोघं इथं लोटा आणि तुम्ही दोघं मागनं गोळा करीत या.’’ सकाळी सहाच्या सुमारास आरोग्य विभागातील मुकादम दीपक मिरजकर यांचा हा आवाज टिपेला गेलेला असतो. त्यांच्या सूचना आल्या की कर्मचाऱ्यांचे हात गतीने काम करायला लागतात... शहराच्या मध्यवर्ती भागाच्या स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे... पहाटे पाचपासून सुरू झालेली त्यांची धावपळ दुपारी दोनला थांबते. शहरातील सर्वच भागात अशा प्रकारे तेथील मुकादम, निरीक्षक कर्मचाऱ्यांना घेऊन शहराची स्वच्छता करीत असतात. गल्लीबोळ असो किंवा मोठे चौक सर्वत्र झाडलोट करावी लागते... ऊन, पाऊस किंवा थंडी या तिन्ही ऋतूंमध्ये त्यांचे काम सुरू असते...
फाळणी अन् तक्रारींची निर्गत
दीपक मिरजकर रोज पहाटे पाचला कोंबडी बाजारजवळील केएमटी कार्यालयासमोर असणाऱ्या आपल्या कार्यालयात येतात. रजिस्टर घेऊन ‘सी १’ वॉर्डच्या कर्मचाऱ्यांचे नियोजन करतात. रजा कोणाची आहे? कोण साप्ताहिक सुटीवर आहे? किती कर्मचारी कामावर आहेत? कोणी कोठे जायचे. कुठल्या भागात जास्त माणसे लावायला हवीत... याचे नियोजन करतात. फोनवरून त्या-त्या कर्मचाऱ्यांना आपापल्या जागी पाठवितात. सहाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, गल्ल्या, बोळ कर्मचारी झाडूने लोटून काढतात. लोटलेल्या कचऱ्याचे ढिग जागोजागी केले जातात. त्यानंतर डंपर येतो... काही कर्मचारी कचऱ्याचे ढीग गोळा करून डंपरमध्ये टाकतात. त्यांच्याकडे हेच काम असते. कर्मचारी कमी असतील तर लोटून झाल्यावर कचरा गोळा करण्याचे कामही करावे लागते. याबद्दल मिरजकर सांगतात, ‘‘कर्मचाऱ्यांचे नियोजन करावे लागते. नाही तर सर्व भागातील कचरा लोटून होणार नाही. मग नागरिकांमधून तक्रारी येतात. त्यामुळे सर्व भागात क्रमाने जातील आणि तेथील कचरा काढतील, हे जाणीवपूर्वक पाहावे लागते...’
हाबक पद्धतीने काम
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात सर्व कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच एकत्र केले जाते. सर्वजण मिळून या परिसराची स्वच्छता करतात. त्यामुळे कमी वेळात जास्त परिसर स्वच्छ करून होतो, याला ‘हाबक पद्धत’ म्हणतात. याबद्दल प्रकाश बोंगाळे सांगतात, ‘‘मुख्य रस्ते, चौक मोठे असल्याने तेथे जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. पहिल्यांदा हे स्वच्छ झाले की मग आतले गल्लीबोळ लोटायला कर्मचारी जातात.’’ शहरातील सर्वच भागांत अशा प्रकारे हाबक पद्धतीने प्रमुख मार्गांची स्वच्छता केली जाते.
मटण मार्केटची आव्हानात्मक सफाई
मटण मार्केटची सफाई रोज केली जाते. हे काम आव्हानात्मक आहे. रोज रात्री येथे कचऱ्याचा डंपर येतो. दुकानात नको असणारे मास, कोंबड्यांची पिसे, माशांचे भाग या सर्व गोष्टी डंपरमध्ये भरल्या जातात. त्याला चारट म्हणातात. त्यानंतर सकाळी पुन्हा मटण मार्केट लोटले जाते. या वेळी उरलेले चारट, कचरा गोळा करून डंपरमध्ये टाकला जातो. हे काम करताना प्रचंड दुर्गंधी येते. याबाबत संतोष आवळे सांगू लागले, ‘‘मटण मार्केटमध्ये कुत्र्यांच्या झुंडी असतात... आधी त्यांना हाकलायला लागते. कधी-कधी कुत्री अंगावर येतात. इथे लोटताना प्रचंड दुर्गंधी असते. त्याचा त्रासही होतो... पण, काय करणार नोकरी आहे करावीच लागणार.’’ रविवारी मोठ्या प्रमाणात मास विक्री होते. त्यानंतर दोन ते तीन डंपर चारट गोळा होते. आठवड्यातून दोन वेळा मार्केट धुतले जाते.
मंडई, बाजारपेठांचा कचरा
महापालिकेच्या अधिकृत मंड्या, लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजार, पाच बंगला परिसरातील भाजी विक्रेते, शाहू उद्यान येथील मंडई, धैर्यप्रसाद मंगल कार्यालयाजवळील मंडई येथील कचऱ्याचा नियमित उठाव केला जातो. त्यानंतर रात्री तेथे लोटलेही जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होतो.
रात्री १० ते दुपारी २
शहरातील काही भागांत रात्रीची स्वच्छता केली जाते. विशेषतः गुजरी, ताराबाई रोड, जोतिबा रोड, अंबाबाई मंदिर परिसर, पार्किंगची ठिकाणे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळांत कर्मचारी झाडलोट करतात. कारण, या भागात सकाळी सहापासूनच वर्दळ सुरू होते. फेरीवाले, फुल विक्रेते येऊन बसतात. त्यामुळे रात्रपाळीचे कर्मचारी हा परिसर लोटून घेतात. कचरा संकलन करून डंपरमध्ये भरतात. पुन्हा सकाळी इथे लोटले जाते. सकाळच्या शिफ्टमधील कर्मचारी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत काम करतात.
टिपरमधून घरगुती कचरा
शहरात टिपरच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो. या वेळी कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा संकलित करतात. गेल्या काही वर्षांपासून बहुतांश नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देतात. टिपरमधून हा कचरा झूम प्रकल्पावर जातो.
कोंडाळामुक्त झाले; पण...
कोंडाळामुक्त शहर अशी ओळख निर्माण केली गेली. मात्र, काही भागांत कचरा टाकण्यासाठी कंटेनर ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण घंटागाडी गेल्यावर काही नागरिक कचरा घेऊन येतात आणि गाडी नसल्याने तो रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे काही मोजक्या ठिकाणी कंटेनर असणे आवश्यक आहे.
स्वच्छतादूत उपेक्षितच
महापालिका आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी हे स्वच्छतादूतच आहेत. पण, त्यांच्याच नशिबी उपेक्षा आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. त्यांना गणवेश पाच वर्षांतून एकदा मिळतो. हातमोजे, गमबूट नाहीत. त्यांचे वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यांचा विमाही उतरविलेला नाही. तरीही हे स्वच्छतादूत अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या प्रकारचा आणि नियमित गणवेश मिळावा, एवढीच माफक अपेक्षा आहे.
Web Title: Kolhapur Hands Working Health People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..