
Kolhapur Jyotiba Temple Case ...तर जोतिबा मंदिराच्या जमिनी परत घेणार
कोल्हापूर : देव किंवा देवस्थानच्या नावावर असणाऱ्या जमिनींची पुराभिलेख खात्याकडून माहिती मागवली आहे. जोतिबा मंदिराच्या जमिनींची विक्री झाली असेल, तर असे बेकायदेशीर व्यवहार रद्द करून पुन्हा ही जमीन जोतिबा मंदिराच्या नावावर केली जाईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी आज दिली.
नाईकवाडे म्हणाले, ‘गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार देव-देवतांच्या नावे असणाऱ्या जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे जोतिबा मंदिराच्या जमिनींचा जर विक्री व्यवहार झाला असेल तर तो रद्द ठरवून संबंधित सर्व जमिनी देवस्थानच्या नावावर केल्या जातील.
जोतिबा देवस्थानच्या कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व कोकणात जमिनी आहेत. या जमिनींची परस्पर विक्री झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सर्व तहसीलदार व महसूलकडून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
ते म्हणाले, की देवस्थान व्यवस्थापन समितीकडून १५ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान सासनकाठी धारकांची वारस नोंदणीसाठी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये, सासनकाठी धारक म्हणून वडील किंवा आजोबांचे नाव असायचे; पण सासनकाठी त्यांचा मुलगा किंवा इतर नातेवाईक घेऊन यात्रेत येत होते.
अशांना या यात्रेत मज्जाव केला होता. तसेच, ज्यांच्या नावावर सासनकाठी त्यांनाच या यात्रेत सहभाग घेता येईल, असे सांगितले होते. याच बदलाच्या अनुषंगाने कागदपत्रे बदलाचेही आवाहन केले होते. याच सासनकाठी धारकांच्या बदलाची किंवा वहिवाटधारकांची नावे मागितली होती.
यामध्ये देवस्थान समितीकडे नोंद नसणारी कागदपत्रेही समोर आली आहेत. याचा अर्थ देवस्थानकडे नोंद नसणाऱ्या अनेक जमिनी असल्याचे आढळून आले. त्यानुसार सर्व तहसीलदार कार्यालयांकडे ही माहिती मागवली जाणार आहे. ज्यावेळी ही माहिती मिळेल, त्यावेळी या जमिनींची खात्री करून घेतली जाईल.
जमिनी पडताळणीचे काम सुरू
सातारा येथून अनेक भक्त येतात. त्यांच्या सासनकाठी आहेत. त्या जमिनींची पडताळणी करण्याचे काम हाती घेतले आहे. बऱ्याच ठिकाणी सासनकाठी व्यवस्थापनासाठी मोठ्या जमिनी दिल्या आहेत. त्याची चौकशी सुरू झाली असल्याचेही नाईकवाडे यांनी सांगितले.
जोतिबा मंदिराच्या जमिनींची शोधमोहीम
‘जोतिबा मंदिराच्या जमिनींची परस्पर विक्री’ या मथळ्याखाली आज ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने जोतिबा मंदिराच्या जमिनींची शोधमोहीम आणि परस्पर विक्री झाल्याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.