कोल्हापूर : मजले डोंगरावर श्रमदानातून हिरवाई साज!

गाव पुढे आले... झाडे जगविण्यासाठी धडपडत राहिले...
श्रमदानातून हिरवाई
श्रमदानातून हिरवाई Sakal

‘डोंगरावरील पळत्यालं पाणी थांबवायचं आणि थांबलेलं पाणी जिरवायचं’ एवढी एकच जिद्द मजले (ता. हातकणंगले) गावकऱ्यांनी २०१८ मध्ये उराशी बांधली आणि पहाटे साडेपाच ते सकाळी आठदरम्यान उजाड डोंगरावर सलग समांतर चरी (सीसीटी), तलाव खोदाई सुरू केली. सात हजार ९९९ झाडे लावली. ८० टक्के झाडे जगली. गावकऱ्यांच्या कष्टाला शासकीय योजनांचेही बळ मिळाले, आणखीही हवे आहे. पोपटराव पवारांसारख्या दिग्गजांचे या चळवळीला मार्गदर्शन लाभले. तलावाची गळती काढण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीप्रमाणे प्रयत्न सुरू आहेत... आता शासकीय यंत्रणेचाही हातभार लागल्यास येत्या पावसाळ्यात झाडे चार-पाच फुटांपर्यंत वाढलेली दिसतील, असा जलमित्रांना विश्‍वास आहे.

सकाळी- सकाळी बाहेर पडलो... उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने आमचा प्रवास सुरू झाला. कोल्हापूरपासून ३०-३५ किलोमीटरवरील मजले लवकर गाठायचे होते... कोल्हापूर-सांगली रस्त्यावर हातकणंगले बसस्थानकापासून दहा मिनिटांच्या अंतरावर मजले फाटा आहे... तेथून मजले तीन किलोमीटरवर... फाट्यावर प्रा. गोमटेश्‍वर पाटील आमची वाट पाहत थांबले होते... त्यांच्याबरोबर चर्चा करीत आमचा प्रवास सुरू झाला... चकाचक रस्ता, दोन्ही बाजूंना हिरवेगार शिवार... गप्पा आणि या माहोलात गावाजवळ पोचलो... शाळेकडे पाहतच गावात प्रवेश केला... चौकात दुचाकीजवळ दोन-तीन जणांच्या गप्पा रंगल्या होत्या... रस्त्यावरील फलक पाहत पुढे निघालो... समोर तरुण दिसले. त्यांच्याकडे सचिन पाटील कोठे राहतात, अशी विचारणा केली... त्यांनी सांगितलेल्या दिशेने गेलो आणि मजलेतील जलमित्र फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते सचिन पाटील भेटले... नमस्कार-चमत्कार झाले... त्यांना सोबत घेतले आणि आमची डोंगराकडे पावले पडू लागली... गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली... खासगी कूपनलिकेतील पाणी भरण्यासाठी १५-२० बॅरेल लावलेले होते. सकाळी एकदाच पाणी बॅरेलमध्ये भरायचे आणि दिवसभरात लागेल तसे न्यायचे हा येथील महिलांचा नित्यक्रम असल्याचे समजले...

पाणी अडवायचं ठरलं...

डोंगराकडे जातानाच डाव्या बाजूला मोठी झाडी. शेजारी बसण्यासाठी बाक आणि समोर मोठा; पण कोरडाठाक तलाव दिसला... समोर डोंगरावर हिरवळ दिसत होती... याच तलावाची गळती निघत नसल्याचे पाटील यांनी सागंतले. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. याच तलावाशेजारी महापुरुषांच्या नावाने ४१ झाडे लावलेली असून, ती काहींनी दत्तक घेतलेली आहेत. त्यांना जतनासाठी कूपनलिका हवी. पण, पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले... बोलत-बोलत डोंगर चढू लागलो आणि सचिन वृक्षारोपण चळवळीबाबत सांगू लागले... ‘‘२०१८ मध्ये धार्मिक कार्यक्रमावेळी चर्चेत डोंगरातून पळणारे पाणी अडवायचं आणि अडवलेलं पाणी जिरवायचं... असा निर्धार केला गेला आणि काही युवकांनी प्रत्यक्ष काम सुरू केले... गावकरीही साथीला आले... पहाटे पाच ते सकाळी आठदरम्यान अख्खं गाव आपापल्या कामांचे नियोजन करून वेळेत हजर राहू लागले... वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरणानेही सोबत आले... निधीही दिला... गावकऱ्यांनी श्रमदानाची जोडही दिली... कामात सुसूत्रता यावी, यासाठी ‘ॲप’च्या माध्यमातून युवक माहिती घेऊ लागले... माहिती घेत निम्मा अर्धा डोंगर पार केला... उन्हाच्या तडाख्याने दम लागला... पाणी प्यायलो आणि पुढे चालू लागलो... आणखी एक जलमित्र माजी सरपंच भरत पाटील तेथे आले... ते सांगू लागले, ‘‘पाणी जिरविण्यासाठी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पोवार यांची भेट घेतली. तेव्हा सीसीटी कंटूर (उतार)बाबत माहिती मिळाली आणि काम सुरू केले. श्रमदानासाठी गाव एकवटलं... यासाठी मग नाम फाउंडेशनचेही सहकार्य लाभले... महिलाही सहभागी झाल्या... त्यांनी डोंगरावर झाडे लावण्यासाठी नर्सरी तयार केली... काळ्या पत्थरात महिला, तरुणांनी अखंड कष्ट करून चरी मारल्या... आर्थिक प्रश्‍न पुढे आले... पण, सरकारी योजनेचा हातभार लागलाच आणि मार्ग निघत गेला... गावातील डॉ. राजकुमार पाटील यांनी वडिलांच्या श्राद्धाचा कार्यक्रम रद्द करून ५० हजार रुपयांची देणगी दिली. सचिन पाटील हे मुलीच्या प्रत्येक वाढदिनी पाच हजार रुपयांची मदत जलमित्र फाउंडेशनला देत राहिले...अगदी त्यादिवशीही मुलीचा वाढदिवस असल्याने सचिन यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिल्याचे भरत यांनी सांगितले...

एकीची ताकद दिसली...

आता ऊन वाढले... करवंदाच्या जाळीतून काळभोर करवंदांचा आस्वाद घेतला... छोट्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली... सभोवार नजर मारली... शास्त्रशुद्ध पद्धतीने झालेल्या चरी पाहताना ग्रामस्थांच्या कष्टाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले... मनातल्या मनात त्यांना सलाम केला... काळा खडक फुटता फुटत नसतानाही गावकऱ्यांनी श्रमदानातून पाडलेल्या या चरींतून पावसाळ्यात पाणी साठून राहते... आणि वाया जाणारे पाणी आज डोंगरातच अडविले-जिरविले जात आहे. सुमारे १०२ हेक्टर भागात १३ वनतळी, समांतर चरी पाच किलोमीटर, तर सीसीटी श्रमदानातून अडीच किलोमीटर तयार करून गावकऱ्यांनी एकीची दाखविलेली ताकद समोर दिसत होती...

डोळ्यांत पाणी आणणारे कष्ट...

चालत पुढे निघालो... डोंगरावरून उजवीकडे पाहिले असता तीन मोठी तळी दिसली... मी पाहतोय, हे लक्षात आल्यावर सचिन म्हणाले, ‘‘वाया जाणारे पाणी जलमित्र चळवळीमुळे या तळ्यांतून साठते. पावसाळ्यात ही तळी तुडूंब भरतात... तुडूंब तळी भरलेली छायाचित्रे पाहून मन अगदी प्रसन्न झाले... पुढे प्लास्टिक टाकी दिसली... उंच डोंगरावर पाणी घेऊन येणे शक्य नसल्याने डोंगरात ठिकठिकाणी पाणी साठविण्यासाठी टाक्या ठेवल्याचे दोघांनी सांगितले... डोंगराखाली टँकर आणून मोटारीने पाणी टाकीत साठवायचे... तेथून बादली, कॅनद्वारे झाडांना घालायचे... एक-एक झाड जगविण्यासाठीची गावकऱ्यांची धडपड ऐकून डोळ्यांच्या कडा ओलावल्या...

चराव बंदीची आवश्‍यकता ठळक...

एक-एक टेकडी उतरत आम्ही पुढे आलो... तेथे तीन-साडेतीन फुटांपर्यंतची वाढलेली झाडे पाहून थांबलो... काही झाडे दोन-अडीच फूट उंचीवर अर्धवट तुटलेली दिसली... त्याबाबत विचारले असता, सचिन-भरत सांगू लागले... चरण्यासाठी जनावरे सोडतात. त्यामुळे उभी राहत असलेली झाडे मोडत आहेत. शासकीय यंत्रणांनी थोडीफार मदत केल्यास ही झाडे वाचू शकतात... डोंगरातील काही भागांत जनावरांचे चरणे बंद केल्यास तीन वर्षांत चार फूट गवत वाढेल. ते शेतकऱ्यांनी फुकट घेऊन जावे... पण, चराव बंदी व्हायला हवी... येथे ४० प्रकारचे गवत आहे. आम्ही लांबकाणी (जि. धुळे) येथे डॉ. मेवाडकर यांनी केलेले काम पाहिले आहे... त्यांनी तेथे जनावरांसाठी फुकट गवत दिले... दुष्काळात आम्ही येथील गवत नाम फाउंडेशनला दिले... चांगले काम समोर येत असताना समस्याही समोर येत आहेत...

कूपनलिका ठरेल आधार...

डोंगरावरील गायरानाबरोबरच जागा पोलिस अधीक्षक कोल्हापूर आणि समादेशक भारत राखीव बटालियन क्रमांक तीन यांच्या नावे सातबारा उताऱ्यावर दिसत आहेत. त्यामुळे पोलिस गावकऱ्यांना काही भागात काहीच करण्यास परवानगी देत नाहीत. येथे लावलेली झाडे जगविण्यासाठी कूपनलिकेची गरज आहे... त्यासाठी परवानगी देण्यासाठी गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्र्यांनी शिफारस केलेली आहे... कूपनलिका झाल्यास येथेही झाडे जगविता येणे शक्य असल्याचे चर्चेत समजले... जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे पाहणी केल्याचेही चर्चेत समजले... पोलिस अधीक्षक आणि बटालियनसाठी राखीव जागा अन्यत्र द्यावी, या दोन्ही कार्यालयांना दिलेल्या जागेवर जाण्यासाठी मोठे रस्ते नाहीत. त्यामुळे ही जागा गायरान ठेवावी, तेथे वृक्षारोपण करण्यास सहकार्य करावे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे येथील आरक्षण बदलल्यास कूपनलिकेचाही प्रश्‍न निकाली निघू शकेल, असे सांगितले...

एकेक पदर उलगडले...

ऊन वाढू लागले. झाडाखाली आमच्यापुढे कामाचे एकेक पदर उलगडत होते... तरुण, महिला, गावकऱ्यांच्या कष्टामुळे मजले गावासह परिसरातील काही गावांत, हातकणंगलेतील जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे. उजाड शिवारांवर ऊस डोलू लागला... विविध शैक्षणिक संस्था, कंपन्या येथे श्रमदान करतात... ‘धनवन’ आणि ‘देवराई’ अशी ९६ प्रकाराची ९९५ झाडे येथे डोलत आहेत... एक मोठे काम आकाराला येत आहे... योजना मांडल्यावर मजलेच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी नेहमीच सहकार्याचा हात दिला आहे... जोडीलाच नाम फाउंडेशन, सयाजी शिंदे, लोकप्रतिनिधी, सामाजिक वनीकरण विभागाकडून नेहमीच साथ मिळाल्याचे दोघांनी सांगितले...

मजलेच्या ओसाड माळरानावर हिरवाईचा साज हळूहळू चढू लागल्याचे रखरखीत उन्हात अनुभवले... रुजलेल्या रोपांचे डेरेदार वृक्षांत रूपांतर होण्याचा विश्‍वास सोबत घेत... सचिन आणि भरत यांना पुढील कामाला शुभेच्छा देऊन... छायाचित्रकार चेचर यांच्याबरोबर या कामाविषयी चर्चा करीत परतीच्या प्रवासाला लागलो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com