
कोल्हापूर : कोण कधी जन्मला, यापेक्षा काम पाहा
नानीबाई चिखली : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे एकत्रित काम करू, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला, यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा समजदारीचा सल्लाही त्यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता दिला. कौलगे (ता. कागल) येथील युवा कार्यकर्ते नंदू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंडलिक बोलत होते.
श्री. मंडलिक म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी म्हणून माझ्यासह मुश्रीफ व संजयबाबा तिघेही एकत्रच काम करीत आहोत; परंतु मधल्या काळात काम करत करत हे दोघे मला जरा विसरले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यासह सीबीआय, प्राप्तिकर या माध्यमातून या देशांत एकप्रकारची अघोषित आणीबाणीच सुरू आहे. या पद्धतीने नेत्यांना नामोहरम करून सत्ता हस्तगत करण्याची कटकारस्थाने रचली जात आहेत.’’
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘भाजपने समाजा समाजामध्ये दुही पसरवून कशाप्रकारे राज्य हस्तगत करता येईल, हा एकमेव अजेंडा ठेवला आहे. कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची स्वाभिमानी भूमी आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने थोडसे वेगळे चित्र निर्माण झाले होते. त्यातून थोडे मतभेद जरी झाले असले तरी माझ्या नेत्याचा मुलगा आणि छोटा गुरुबंधू असल्यामुळे काहीही झालं तरी आम्ही तिघेही नेतेमंडळी एकत्रच आहोत.’’
आठवड्यापूर्वी रामनवमीला माझा वाढदिवस झाला, असे म्हणत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘आता त्या वाढदिवसाचे संशोधन सुरू आहे. एखाद्या माणसाने कुठल्या दिवशी जन्मावं आणि तो दिवस नसावा, याविषयी संशोधन व्हावं हा दुर्दैवी प्रसंग आहे.’’
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘‘श्री. मुश्रीफ रामनवमीला जन्मले आहेत. आता मी त्यादिवशी जन्मलो नाही त्याला काय करूया? असा उपरोधिक टोलाही त्यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता लगावला.
मुश्रीफ आमचे दादा
यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यापेक्षा लहान आहेत असे समजायचो; परंतु या सगळ्या वादात एक गोष्ट स्पष्ट झाली की एक महिन्याने का असेना ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. मोठा भाऊ म्हणून त्यांचा आदर अधिकच वृद्धिंगत होईल. कारण ते आमचे दादा आहेत, असे घाटगे म्हणाले.
Web Title: Kolhapur Minister Mushrif Work Rather
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..