कोल्हापूर - मुंबई विमानसेवा हवेतच; नाईट लँडिंग, कार्गोसह अन्य मुद्देही प्रलंबित

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदेंकडून आशा
Kolhapur - Mumbai Airline Service night landing cargo jyotiraditya scindia
Kolhapur - Mumbai Airline Service night landing cargo jyotiraditya scindiasakal

कोल्हापूर : येथील कोल्हापूर विमानतळावरून रोज उड्डाणे होत असली तरी अद्याप नाईट लँडिंग, कार्गोसेवा, महामार्गापासून प्रवेश, रेंगाळलेले विस्तारीकरण, वाढीव धावपट्टी, गडमुडशिंगी परिसरातील वीज कंपनीचे स्थलांतर, असे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. कोल्हापूर- मुंबई सेवाही केवळ चर्चेत आहेत. येथे नेत्यांचे प्रयत्नही अपुरे ठरत आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे उद्या (शनिवारी) कोल्हापूरला भेट देत आहेत. या निमित्ताने ते तातडीने कोल्हापूर - मुंबई विमान सेवा आणि किमान प्रवासी विमान सेवेतून कार्गो सेवा सुरू करण्याबाबत ठोस आश्वासित करतील, हीच कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत कोल्हापूर विमानतळावरील विमान सेवा सध्या सुरू आहे. आमदार, खासदार, मंत्री यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विमानतळाला उर्जितावस्था आली आहे. मात्र, ती कोल्हापूरच्या विकासासाठी पुरेशी नाही. मुंबई, दिल्लीहून अनेक प्रवाशांसह नेतेमंडळींनाही बेळगाव विमानतळावर उतरून मोटारीने कोल्हापुरात यावे लागते. ज्या मुंबई- कोल्हापूर- मुंबई या हवाई मार्गाने कोल्हापूर विमानतळ सुरू झाले तोच मार्ग अनेक वर्षे बंद आहे.

कोल्हापुरातील विमान सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. कोरोनानंतरही विमान सेवेला मागणी वाढत आहे. त्यामुळेच अहमदाबादपर्यंत विमान सेवा सुरू आहे. बंगळूर, हैदराबाद, तिरुपती या मार्गावरील सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. आता याच बरोबर शिर्डी आणि गोवा तसेच कोल्हापूर-पुणे व्हाया मुंबई अशीही विमान सेवा सुरू व्हावी, अशी मागणी आहे. याही हवाई मार्गावर विमान सेवा सुरू झाल्यास कोल्हापुरातील विमानसेवा आणखी वाढण्यास मदत होणार आहे. तिरुपतीबरोबरच शिर्डी हे धार्मिक ठिकाणही थेट कोल्हापूरशी जोडले जाणार आहे. याचाही विचार केंद्रीय पातळीवर झाला पाहिजे.

जिल्ह्यासह शेजारी सांगली, सातारा आणि निपाणी परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आणि पूरक उत्पादने घेतली जातात. कोल्हापूर औद्योगिक नागरी म्हणून ओळखले जाते. येथे जर कार्गो सेवा सुरू झाली, तर खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनी कार्गो सेवेची मागणी केली होती.

कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण अनेक वर्षे रखडले आहे. नाईट लँडिंगसाठीचे अनेक अडथळे दूर केले आहेत. त्याचे प्रात्यक्षिकही झाले आहे. तरी ते अद्याप नियमित सुरू नाही. केंद्रीय समितीकडून त्याला ग्रीन सिग्नल अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले जाते. येथे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातल्यास नाईट लँडिंग सुरू होणे फार मोठी गोष्ट नाही. सध्या असलेली धावपट्टी २३०० मीटरपर्यंत करण्यासाठी विस्तारीकरणातील भूसंपादन सुरू झाले आहे. मात्र, गडमुडशिंगी येथे असलेले वीज केंद्र स्थलांतरित करण्याची प्रक्रिया रखडलेली आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गातून विमानतळाकडे येणारा चौपदरीकरणाचा रस्ता चर्चेतच आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी ठरविले, तर अनेक प्रश्न ते सहा महिने ते वर्षात निकाली काढू शकतात.

..तर विमानसेवेला आणखी भरारी

कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे शनिवारी (ता. ३) येत आहेत. त्यांनी या प्रश्नावर ठोस निर्देश दिल्यास रखडलेल्या कामांना नक्कीच गती येईल. किमान कोल्हापुरातील कार्गो विमानसेवेसह केवळ चर्चेत असलेली मुंबई- कोल्हापूर विमान सेवा सुरू होण्यास असलेले अडथळे कमी होतील, या निमित्ताने कोल्हापूरच्या विमानसेवेला आणखी भरारी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com