Kolhapur : गल्ली ते मुंबईपर्यंत मुली असुरक्षित Kolhapur Mumbai girls vulnerable | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुली

Kolhapur : गल्ली ते मुंबईपर्यंत मुली असुरक्षित

कोल्हापूर : एका आमदाराने थेट आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी सभागृहात टाहो फोडला. करवीर तालुक्यातील मुलीचे फेसबुक, इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून बदनामी केली. काल, बुधवारी बोंद्रेनगरातील पित्याचे छत्र हरपलेल्या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या नराधमाच्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःचे जीवन संपविले.

या सर्वच घटनेत आई-वडील, नातेवाईकांकडून एकच म्हणणे पुढे येत आहे. सांगा आमचे काय चुकले? मुलगी झाली म्हणून आमच्या वाट्याला हे आले काय? या घटनांवरून गल्ली ते मुंबईपर्यंत मुली सुरक्षित नसल्याचे अधोरेखित होत आहे.

काही दिवसांपूर्वीच बाप नसलेल्या मुलीला या त्रासातून बाहेर काढण्यासाठी चुलत्याने, तिच्या आईने प्रयत्न केले होते. मात्र, थेट चुलत्यालाच ठार मारीन, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्या मुलीने तरुणाच्या त्रासातून कायमचे मुक्त होण्यासाठी आत्महत्या केली. आज त्यांच्या घरी कुटुंबीय हतबल होऊन बसल्याचे दिसले. मुलीच्या चुलत्याने तुम्हीच सांगा, आमचे काय चुकले? असाच सवाल केला.

काही वर्षांपूर्वी याच परिसरात नराधमाच्या त्रासाला कंटाळून याच बिरादरीतील मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनात अनेक पथके तयार झाली. समुपदेशन होणे आवश्‍यक असल्याबाबत चर्चा झाली. मात्र, पुन्हा आठ-दहा वर्षांनी याची पुनरावृत्ती झाली. हे कोणा एकाचे नव्हे तर अख्या समाजाचे अपयश म्हणावे लागेल.

एकीकडे लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा म्हणायचे आणि त्यांच्या सुरक्षेचे काय? यावर पुन्हा पुन्हा प्रश्‍नचिन्‍ह निर्माण होत आहे. करवीर तालुक्यातील एका कॉलेजच्या तरुणीची सोशल मीडियावर नाहक बदनामी केली जात असल्याचा गुन्हा नुकताच करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. तेथेही तुम्हीच सांगा आमचे काय चुकले? असे

बापाने विचारले.

मुलीचे बाप म्हणून त्‍याला होणाऱ्या वेदना किती भयंकर असतात हे त्या बापालाच कळते. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईत सुरू असताना एका आमदाराने थेट आपली मुलगीच सुरक्षित नसल्याचे टाहो फोडून सभागृहाला सांगितल्याचे उदाहरणही ताजे आहे.

समाजाने पुढे येण्याची गरज

एक ना अनेक उदाहरणे अशी आहेत, त्यावरून खरोखरच आपल्या लेकी सुरक्षित आहेत काय? हा सवाल उभा राहतो. हे सर्व रोखायला एखादा पोलिस, एखादा पालक नव्हे तर समाजाने पुढे येण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी मुलींना त्रास होतो त्या ठिकाणी एकमूठ होऊन नराधमाला शिक्षा देण्यासाठी एकत्र आले पाहिजे; अन्यथा पुन्हा आठ-दहा वर्षांनी अशीच स्थिती आपल्या घरात झाली तर पश्‍चाताप करणे चुकीचे ठरेल.